नागपुरात पोटच्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न, पित्याची आत्महत्या
By योगेश पांडे | Updated: November 20, 2025 23:10 IST2025-11-20T23:10:07+5:302025-11-20T23:10:29+5:30
रामप्रसादने विनाकारण वाद घालण्यास सुरुवात केली. संतापाच्या भरात त्याने मुलीला बेदम मारहाण केली व तिच्यावर चाकूने वार केले.

नागपुरात पोटच्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न, पित्याची आत्महत्या
- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संशयाचा किडा डोक्यात गेल्याने एका पित्याच्या अंगात अक्षरश: सैतान संचारला व त्याने पोटच्या मुलीचा चाकूने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. तिला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून तो घराबाहेर पडला व कारवाईच्या भीतीपोटी विषप्रशान करून स्वत:चादेखील जीव दिला. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
रामप्रसाद तिवारी (५३, झेंडा चौक, मानकापूर), असे आरोपी पित्याचे नाव आहे. तो प्रॉपर्टीची दलाली करायचा. त्याला पत्नी व तीन मुली आहेत. मोठी मुलगी बारावीत होती व त्याने तिचे शिक्षण बंद करविले होते. तो सातत्याने तिच्यावर संशय घ्यायचा व घरगुती वाद उकरून काढत वाद घालायचा. गुरुवारी दुपारी तिवारीची पत्नी मंदिरात गेली होती, तर दोन लहान मुली शाळेत गेल्या होत्या. रामप्रसादने विनाकारण वाद घालण्यास सुरुवात केली. संतापाच्या भरात त्याने मुलीला बेदम मारहाण केली व तिच्यावर चाकूने वार केले. यात मुलगी रक्तबंबाळ झाली. तिला रक्ताने माखलेल्या अवस्थेत पाहून तिवारी घाबरला व त्याने घरातून पळ काढला. आरडाओरड ऐकून शेजारी जमले.
दरम्यान, तिवारी मानकापूर रेल्वे लाईन परिसरात गेला. मुलगी मरण पावली आहे, या समजातून कारवाईच्या भीतीपोटी त्याने विषारी औषध पिले. काही वेळातच तो बेशुद्ध पडला. त्याच्या तोंडातून फेस येत असल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्याला मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, मुलीला एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती ठाणेदार हरीश काळसेकर यांनी दिली.