भीषण! गार्ड लाईनमध्ये महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; रेल्वे क्वाॅर्टरला लावली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2023 21:35 IST2023-04-27T21:35:16+5:302023-04-27T21:35:44+5:30
Nagpur News तहसील पोलिस ठाण्यांतर्गत गार्ड लाईन परिसरात गुन्हेगारांनी एका महिलेचे घर पेटवून दिले. आगीने मोठे रूप धारण न केल्याने महिलेचे प्राण वाचले.

भीषण! गार्ड लाईनमध्ये महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; रेल्वे क्वाॅर्टरला लावली आग
नागपूर : तहसील पोलिस ठाण्यांतर्गत गार्ड लाईन परिसरात गुन्हेगारांनी एका महिलेचे घर पेटवून दिले. आगीने मोठे रूप धारण न केल्याने महिलेचे प्राण वाचले. या घटनेमुळे महिला आणि तिचे कुटुंबीय दहशतीत आहेत.
गार्ड लाइन येथे राहणारा ५१ वर्षीय कृष्णा बोईनवार हे रेल्वेत नोकरीला होते. त्यांना एका प्रकरणात निलंबित करण्यात आले. ते सध्या मेट्रोमध्ये गार्ड म्हणून काम करतात. कृष्णा हे पत्नी आयशा ऊर्फ राणीसोबत गार्ड लाइन परिसरात राहतात. रेल्वेच्या बांधकामामुळे गार्ड लाइनचे बहुतांश रेल्वे क्वाॅर्टर पाडण्यात आले आहेत. फक्त एक चतुर्थांश शिल्लक आहे व त्यातील एकात कृष्णा आणि आयशा राहतात. नाइट ड्यूटीवर असल्याने कृष्णा कामावर जातात. आयशा घरात एकट्याच असतात. बुधवारी रात्री २ वाजता आयशाला खोलीतून धूर निघताना दिसला. मानसिक उपचारांसाठी औषध घेतल्यावर त्यांना गाढ झोप लागते. गुरुवारी सकाळी ७ वाजता कृष्णा ड्यूटीवरून घरी पोहोचले तेव्हा त्यांना दरवाजा जळालेला दिसला. त्यांनी आयशाला या घटनेबाबत विचारणा केली व तहसील पोलिसांना माहिती दिली. आगीत दरवाजा, कूलर आदी जळून खाक झाले आहेत. आग विझवण्यासाठी खड्डा तयार करण्यात आला होता.
कटाचा संशय...
ही घटना कोणत्यातरी कटातून घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परिसरात रात्री गुन्हेगारांचे येणे जाणे असते व ते दारूच्या नशेत असतात. याची माहिती असूनही तहसील पोलिस कोणतेही पाऊल उचलत नाहीत. कृष्णा आणि त्यांच्या पत्नीला नेहमी गुन्हेगारांची भीती असायची. मात्र पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे व गुन्हेगारांना इजा होण्याची भीती असल्याने त्यांनी फिर्याद दिली नाही. आग घरापर्यंत पोहोचली नसल्याने आयेशाचा जीव वाचला, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.