चेंडूने कारागृहात गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 21:45 IST2020-08-06T21:41:35+5:302020-08-06T21:45:28+5:30
कारागृहात गांजा भरलेला चेंडू फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

चेंडूने कारागृहात गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारागृहात गांजा भरलेला चेंडू फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
शेख वसीम शेख मुसा (वय २६) तसेच तमासर रहमत वसीम अहमद ( वय २४) अशी आरोपींची नावे आहेत. वसीम गिट्टीखदानमधील अहबाब चौकात तर अहमद मानकापूरच्या ताज नगरमध्ये राहतो. अमली पदार्थाचे व्यसन असलेल्या आणि कारागृहात बंद असलेल्या सराईत गुन्हेगारांना हे दोघे नियमित वेगवेगळ्या मार्गाने अमली पदार्थ पोहोचवितात. रविवारी सायंकाळी वसीम आणि अहमद हे दोघे कारागृहाच्या मागच्या बाजूला उभे राहिले. त्यांनी टेनिस बॉलमध्ये गांजा भरला आणि गांजाने भरलेला हा बॉल फेविकॉलने चिपकवून तो त्यांनी भिंतीवरून आत फेकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गांजा तसेच मोबाईल आणि दुचाकी असा ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्यांची चौकशी सुरू आहे.