नागपुरात जुन्या वादातून हल्ला : तरुण गंभीर जखमी, आईलाही मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 19:23 IST2020-05-18T19:20:55+5:302020-05-18T19:23:05+5:30
जुन्या वादातून एका तरुणावर तिघांनी प्राणघातक हल्ला चढवला. शस्त्राचे घाव घालून त्याला गंभीर जखमी केले. जखमी तरुणाची आई मदतीला धावली असता आरोपीने तिलाही मारहाण केली.

नागपुरात जुन्या वादातून हल्ला : तरुण गंभीर जखमी, आईलाही मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुन्या वादातून एका तरुणावर तिघांनी प्राणघातक हल्ला चढवला. शस्त्राचे घाव घालून त्याला गंभीर जखमी केले. जखमी तरुणाची आई मदतीला धावली असता आरोपीने तिलाही मारहाण केली.
रविवारी रात्री ११ च्या सुमारास अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सुदर्शन संजय जाधव (वय २२) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ,वसंतनगर गल्ली नंबर १३ येथे राहतो. सुदर्शनच्या भावासोबत आरोपी सनी जांगिडयाचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. यावेळी सुदर्शनने सनीला दमदाटी केली होती. सनीच्या मनात तो राग होता. रविवारी रात्री ११ च्या सुमारास सुदर्शन त्याच्या मित्रांसोबत घरासमोर गप्पा करीत बसला होता. तेवढ्यात आरोपी सनी आणि त्याचे दोन साथीदार तेथे आले. त्यांनी सुदर्शन सोबत वाद घालून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. डोक्यावर, हातावर वार झाल्याने सुदर्शन गंभीर जखमी झाला. मुलाला शस्त्राने मारत असल्याचे पाहून सुदर्शनची आई बचावासाठी धावली असता आरोपीने त्यांनाही मारहाण केली. त्यामुळे आईच्या हातावरही जखमा झाल्या. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यानंतर आरोपी पळून गेले. या घटनेची तक्रार सुदर्शन जाधव यांनी अजनी पोलिस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी कलम ३२६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी सनी आणि त्याच्या साथीदारांची चौकशी सुरू आहे. जखमी सुदर्शन जाधव यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.