महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; दोनशेहून अधिक पोलिसांकडून आरोपीचा शोध, सुगावा नाहीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 02:18 PM2023-10-07T14:18:47+5:302023-10-07T14:19:12+5:30
महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
नागपूर : महाविद्यालयात जाणाऱ्या एका विद्यार्थिनीवर हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुऱ्हाडीचा धाक दाखवून अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपीचा तिसऱ्या दिवशीदेखील शोध लागू शकलेला नाही. त्याच्या शोधासाटी दोनशेहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांकडून विविध ठिकाणी शोध सुरू आहे. मात्र अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. या घटनेमुळे नागपूर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी ‘फेव्हरेबल’ आकडेवारी जारी करून स्वत:ची पाठ थोपटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यात अपयश आल्याचे प्रत्यक्षातील वास्तव आहे.
वर्धा मार्गाजवळील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर बुधवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान अत्याचार झाला. बसमधून उतरल्यावर विद्यार्थिनी पायी महाविद्यालयाकडे निघाली असताना एका आरोपीने तिचा पाठलाग करत कुऱ्हाडीचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. मुलगी फोनवर बोलत असल्याने तिच्या बहिणीने हा प्रकार ऐकला व तिने तातडीने महाविद्यालयात फोन करून माहिती दिली. महाविद्यालयातील कर्मचारी वेळेत पोहोचल्याने विद्यार्थिनीचा जीव वाचला.
या घटनेमुळे पोलिस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दोनशेहून अधिक पोलिस कर्मचारी आरोपीच्या शोधासाठी तैनात करण्यात आले आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. घटनास्थळापासून २ किलोमीटरच्या परिसरात प्रत्येक इमारतीत शोध घेण्यात येत आहे. याशिवाय परिसरातील संशयित आणि गुन्हेगार तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. संबंधित परिसरात सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. आरोपी मेंढपाळ असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे कॅम्पसमध्ये येणाऱ्या मेंढपाळांचीही माहिती गोळा केली जात आहे. पोलिसांना घटनास्थळावरून कुऱ्हाड सापडली आहे. त्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिस उपायुक्त अनुराग जैन व मुमक्का सुदर्शन हे स्वत: तपासाचे नेतृत्व करत आहेत.
विद्यार्थिनीसह कुटुंबीयांना सहन करावा लागतोय मन:स्ताप
संबंधित विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी झाली असली तरी काही काही चाचण्या शिल्लक आहेत. त्यासाठी तिला शुक्रवारीदेखील मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. मात्र सकाळी साडेअकरा वाजतापासून दुपारी चार वाजेपर्यंत ती तेथेच होती. याशिवाय हिंगणा पोलिसांनीदेखील तिला घटनेबाबत विचारणा केली. अगोदर विद्यार्थिनी दहशतीत आहे. त्यावर असे प्रकार सुरू असल्याने नातेवाइकांमध्ये नाराजीचा सूर आहे.