कार्यालयातील सहकारी महिलेवर अत्याचार, क्लिप व्हायरल करण्याची धमकी
By योगेश पांडे | Updated: March 29, 2023 16:59 IST2023-03-29T16:58:49+5:302023-03-29T16:59:04+5:30
अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कार्यालयातील सहकारी महिलेवर अत्याचार, क्लिप व्हायरल करण्याची धमकी
नागपूर : कार्यालयातील एका सहकारी महिलेवर शारीरिक अत्याचार करून त्यानंतर तिच्या आईवडीलांना जीवे मारण्याची तसेच व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. आशीष घनश्याम लद्दढ (३९, गोधनी मार्ग, मानकापूर) असे आरोपीचे नाव आहे. आशीष हा मुळचा अमरावती येथील सातुरना, गोविंदनगर येथील रहिवासी आहे.
आशीषचा कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणीवर डोळा होता. तिच्या घरी तो कार्यालयीन कामाच्या बहाण्याने गेला व घरी कुणीच नसल्याची संधी साधत जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. याची वाच्यता केल्यास तिच्या आईवडिलांना मारण्याची त्याने धमकी दिली. तसेच मी तुझ्याशी लग्न करेल, असे आमिषदेखील दाखविले. काही दिवसांनी तरुणीने त्याला लग्नाबाबत विचारले असता अगोदर त्याने टाळाटाळ केली व त्यानंतर थेट नकार दिला. जर यानंतर अशी विचारणा केली तर व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर तरुणीने अजनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
पोलिसांनी आशीष विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशीषचे नातेवाईक एका कंपनीचे संचालक असून त्याचे लग्नदेखील झाले आहे.