‘आशिकी’तून दारुड्याने जाळले आशावर्करचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 21:23 IST2022-06-03T21:23:17+5:302022-06-03T21:23:42+5:30
Nagpur News मागील काही महिन्यांपासून एका आशावर्करच्या मागे लागलेल्या तरुणाने दारूच्या नशेत तिला मारहाण करत तिचे घरच जाळण्याचा प्रयत्न केला.

‘आशिकी’तून दारुड्याने जाळले आशावर्करचे घर
नागपूर : मागील काही महिन्यांपासून एका आशावर्करच्या मागे लागलेल्या तरुणाने दारूच्या नशेत तिला मारहाण करत तिचे घरच जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे इमामवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत खळबळ उडाली होती. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या संबंधित महिलेच्या पतीचे निधन झाले असून तिला दोन लहान मुली आहेत. कुुटुंबाची गुजराण करण्यासाठी ती मेहनत घेते. कोरोना काळात कर्तव्यावर असताना विराट ईश्वर मोगरिया (२५, पाचपावली, ठक्करग्राम) याची तिच्याशी ओळख झाली. त्याने तिचा घरापर्यंत पाठलाग केला. तिचे लग्न झालेले नाही, असा त्याचा समज झाला होता. मात्र आपले लग्न झाले असून नवऱ्याचे निधन झाले व दोन मुलीही असल्याची बाब स्पष्ट करत पाठलाग न करण्याबाबत बजावले होते. तरीही त्याने आपल्या आईलादेखील तिच्या घरी आणले व हिचे लग्न झाले नसून मुली तिच्या बहिणीच्या आहेत, अशी थाप मारली होती.
मनाई करूनदेखील तो वारंवार दारूच्या नशेत तिच्या घरी यायचा व गोंधळ घालायचा. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो तिच्या घरी आला व तुला बॉयफ्रेंड आहे, अशी भाषा वापरत जोरजोरात शिवीगाळ करायला लागला. महिला घरात गेली व दरवाजा बंद केला. परंतु दारूच्या नशेतील विराटने दरवाजा उघडला व घरात शिरून तिला मारहाण करायला लागला. भीतीपोटी महिला घराबाहेर पळाली असता त्याने घराला आग लावली. यात घरातील सामानाचे नुकसान झाले. त्यानंतर महिलेने त्वरित पोलिसांना संपर्क केला. पोलीस येईपर्यंत विराट पसार झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.