मेडिकल चालवताय की किराणा दुकान? नागपूरमध्ये वर्षभरात १२० विक्रेत्यांचे परवाने निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 15:57 IST2026-02-21T15:51:54+5:302026-02-21T15:57:06+5:30
नियमांची अंमलबजावणी काही अंशी कमकुवत : बेशिस्त विक्रेते घेतात याच संधीचा फायदा

Are you running a medical or grocery store? Licenses of 120 vendors suspended in Nagpur in a year
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि नियमांना धाब्यावर बसवणाऱ्या औषध विक्रेत्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा बडागा उगारला आहे. विनाप्रिस्क्रिप्शन औषधे देणे आणि तांत्रिक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात जवळपास १२० किरकोळ व घाऊक औषधविक्रेत्यांचे निलंबित करण्यात आले आहेत. परवाने जिल्ह्यात किरकोळ व ठोक औषधविक्रेते किती ?
नागपूर जिल्ह्यात घाऊक आणि किरकोळ मिळून जवळपास ६ हजार औषधी दुकाने आहेत. परंतु या सर्व दुकानांची नियमित आणि प्रभावी तपासणी करण्यासाठी प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. परिणामी, नियमांची अंमलबजावणी काही अंशी कमकुवत झाली असून, त्याचाच फायदा काही बेशिस्त विक्रेते घेत असल्याचे दिसून येते.
परवाना एकाचा, चालवितो दुसराच
अनेक मेडिकल स्टोअर्समध्ये ज्या फार्मसिस्टच्या नावाने परवाना घेतला आहे, तो प्रत्यक्ष दुकानात नसतो. परवाना भाड्याने देऊन अननुभवी व्यक्तींकडून औषध विक्री केली जात असल्याचे अनेक तपासण्यांतून स्पष्ट झाले आहे. तांत्रिक माहिती नसलेली व्यक्ती चुकीचे औषध देण्याची शक्यता अधिक असते.
६ विक्रेत्यांचे परवाने रद्द
एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत अन्न व औषध प्रशासन नागपूरने केलेल्या कारवाईत १०४ किरकोळ औषधविक्रेत्यांचे परवाने निलंबित केले, तर ५ विक्रेत्यांचे परवाने रद्द केले. याच कालावधीत १६ घाऊक औषधविक्रेत्यांचे परवाने निलंबित केले तर १ विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात आला. एकूणच १२० किरकोळ व घाऊक विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर ६ किरकोळ व घाऊक विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
औषधांची 'एक्सपायरी' तपासणे गरजेचे
औषध खरेदी करताना ग्राहकांनी स्ट्रिपवरील 'एक्सपायरी डेट' बारकाईने पाहणे आवश्यक आहे.
कालबाह्य औषध घेतल्यास रिअॅक्शन येणे किंवा प्रकृती अधिक बिघडण्याचा धोका असतो.
मेडिकल स्टोअरमध्ये एक्सपायर्ड औषधांसाठी स्वतंत्र कप्पा असणे कायद्याने बंधनकारक आहे, परंतु अनेकदा ती विक्रीसाठी ठेवल्याचे आढळते.
रुग्णालयांसह औषधालयांचीही संख्या वाढतेय!
नागपूर हे मध्य भारताचे मेडिकल हब बनल्याने शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मल्टिस्पेशालिटी रुग्णालये उभी राहिली आहेत.
या रुग्णालयांच्या बरोबरीनेच प्रत्येक गल्लीबोळात औषधालयांचे जाळे पसरले आहे.
मात्र, व्यवसाय वाढवण्याच्या स्पर्धेत अनेक ठिकाणी औषध विक्रीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.
औषधविक्रेत्यांची वेळोवेळी तपासणी
'औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्या'नुसार औषध निरीक्षकांमार्फत औषधविक्रेत्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. विनाप्रिस्क्रिप्शन औषध विक्री, फार्मसिस्टची अनुपस्थिती, तापमानाचे नियम न पाळणे व इतरही तांत्रिक त्रुटी आढळल्यास नोटीस बजावली जाते आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कारवाई केली जाते. ग्राहकांनीही औषध घेताना पक्के बिल मागणे बंधनकारक आहे.
- मनीष चौधरी, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नागपूर