‘आपली बस’ची दुचाकीला धडक : आईसह मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 23:49 IST2019-02-05T23:48:11+5:302019-02-05T23:49:05+5:30
वेगात असलेल्या आपली बस(स्टार)ने विरुद्ध दिशेने येणाऱ्या अॅक्टिव्हाला जोरादर धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या अॅक्टिव्हावरील आई व मुलाचा मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर - नागपूर मार्गावरील फेटरी शिवारात असलेल्या हनुमान मंदिराजवळ मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

‘आपली बस’ची दुचाकीला धडक : आईसह मुलाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कळमेश्वर) : वेगात असलेल्या आपली बस(स्टार)ने विरुद्ध दिशेने येणाऱ्या अॅक्टिव्हाला जोरादर धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या अॅक्टिव्हावरील आई व मुलाचा मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर - नागपूर मार्गावरील फेटरी शिवारात असलेल्या हनुमान मंदिराजवळ मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
सरस्वती गजभिये (५०) व पंकज गजभिये (३०) दोघेही रा. नागपूर अशी मृतांची नावे आहेत. पंकज हा त्याच्या आईसोबत एमएच-४९/आर-१७६४ क्रमांकाच्या अॅक्टिव्हाने नागपूरहून कळमेश्वरच्या दिशेने येत होता. शिवाय, काही प्रवासी घेऊन एमएच-३१/सीए-६१६० क्रमांकाची आपली बस कळमेश्वरहून बर्डी (नागपूर)ला जात होती. दरम्यान, फेटरी शिवारातील हनुमान मंदिराजवळ आपली बसने पंकजच्या अॅक्टिव्हाला जोरदार धडक दिली.
त्यात पंकज आणि त्याची आई गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच पंकजचा मित्र योगेश शिंदे हा लगेच घटनास्थळी पोहोचला. त्याने दोघांनाही लगेच नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. दुसरीकडे, कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय, अपघातग्रस्त आपली बस व अॅक्टिव्हा ताब्यात घेतली. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सोनोने करीत आहेत.