महाविकास आघाडीला आणखी एक धक्का, कुंभारे, बोढारे पाठोपाठ दुधराम सव्वालाखे भाजपात
By कमलेश वानखेडे | Updated: May 2, 2025 19:02 IST2025-05-02T19:01:48+5:302025-05-02T19:02:35+5:30
राज्यात सत्ता जातात पडझड सुरू, आता कुणाचा नंबर ? : लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तब

Another setback to Mahavikas Aghadi, Dudhram Savvalakhe joins BJP after Kumbhar and Bodhare
कमलेश वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीमध्ये पडझड सुर झाली आहे. महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्यकाळ पूर्ण केलेले नेते आता आपल्या पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. याच कळीत आता दुधराम सव्वालाखे यांचेेही नाव जोडले गेले असून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. सव्वालाखे यांचा भाजप प्रवेश हा माजी मंत्री सुनील केदार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषदेत सदस्य राहिलेले समीर उमप (शेकाप) यांनी सर्व प्रथम भाजप मध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी काँग्रेसचा हात सोडत केदार गटाला जोराचा धक्का दिला. हिंगणा मतदारसंघात उमेदवारीसाठी दावेदारी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या (शरद पवार) उज्वला बोढारे यांनीही नुकतेच भाजपचा दुपट्टा गळ्यात घातला. महाविकास आघाडीला एकामागून एक धक्के बसत असताना आता दुधराम सव्वालाखे यांनीही काँग्रेसची साथ सोडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काळात आणखण्काही प्रवेश होण्याची शक्यता आहे.
सव्वालाखे यांनी जिल्हा परिषदेत नगरधन-भंडारबोडी सर्कलचे प्रतिनिधित्व केले. जिल्हा परिषदेत गटनेते पदासाठी त्यांनी फिल्डिंग लावली होती. पण ते जमले नाही. रामटेकच्या तिकीटासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. गेल्या काही दिवसांपासून सव्वालाखे काँग्रेसमध्ये असस्थ होते. त्यांच्या हालचालीतून ते भाजपमध्ये प्रवेश करीत असे संकेतही मिळत होते. शेवटी महाराष्ट्र दिन व कामगार दिनी कामठी शहरात आयोजित भाजपच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश घेतला.
"आपल्या जिल्हा परिषद सर्कलमधील विकास कामे मागील अडीच वर्षांपासून थांबलेली होती. ती विकासकामे, रामटेक मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर व सर्व जनतेची कामे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात करण्याकरिता आपण भाजपात प्रवेश केला."
- दुधराम सव्वालाखे, माजी जिल्हा-परिषद सदस्य