नागपूरचा डॉन आंबेकरविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 11:48 PM2019-10-18T23:48:53+5:302019-10-18T23:54:12+5:30

कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर आणि त्याच्या साथीदाराने गुजरातच्या आणखी एका व्यावसायिकाला एक कोटींचा गंडा घातल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.

Another case was registered against Nagpur's Don Ambekar | नागपूरचा डॉन आंबेकरविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

नागपूरचा डॉन आंबेकरविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देविमानतळ परिसरात जमिनीचा सौदावापीच्या व्यावसायिकाचे एक कोटी हडपलेपिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर आणि त्याच्या साथीदाराने गुजरातच्या आणखी एका व्यावसायिकाला एक कोटींचा गंडा घातल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. ही रक्कम परत मागितली असता पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकीही दिल्याने आंबेकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सोनेगाव पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे.
हेमंत मोहनजी पुरोहित (वय ३१) असे फसवण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव असून, ते गुजरातच्या वापी येथील देसाई वॉर्डात राहतात. पुरोहित कॉस्मो प्लास्टिक वेस्टचा व्यवसाय करतात. ते प्रॉपर्टी डीलिंगही करतात. त्यांना महाराष्ट्रात कोणत्याही मोठ्या शहरात गोदामासाठी जागा हवी होती. त्यासाठी ते शोधाशोध करीत होते. आंबेकरचा साथीदार रमेश ऊर्फ राम पाटील याने पुरोहित यांना जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यानिमित्ताने पाटीलने पुरोहित यांची कुख्यात आंबेकरसोबत ओळख करून दिली. जमिनीच्या व्यवहाराची बातचीत झाल्यानंतर आंबेकरने पुरोहितांना बालाजी फर्ममध्ये २५ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार पुरोहित ही रोकड बालाजी फर्ममध्ये जमा करण्यास तयार झाले.
नोटा बदलविण्याची ऑफर
त्याचवेळी आरोपी पाटीलने पुरोहित यांना तुम्हाला नोटा बदलवायच्या आहेत का, असा प्रश्न केला. तुम्ही २ हजारांच्या नोटा (१ कोटी) जमा केल्यास तुम्हाला १ लाख रुपये आणि ५०० च्या एक कोटी रुपये जमा कराल तर तुम्हाला १ लाख रुपये कमिशन मिळेल, असे सांगितले. हा सर्व व्यवहार हवालाने करण्यास सांगितले. पुरोहित यांनी एक लाख रुपयांच्या कमिशनच्या आमिषापोटी २० ऑगस्ट २००८ ला पुरोहित यांनी वापी (गुजरात) येथून बालाजी फर्ममध्ये एक कोटी रुपये जमा केले. त्यावेळी त्यांना १० रुपयाची एक नोट (नंबर ४४ एम ८०९६८१) फाडून त्याचा अर्धा भाग देण्यात आला.

नोट घेतली, धमकी दिली
एक कोटी रुपये घेतल्यानंतर ही अर्धी (फाटलेली दहाची) नोट दाखविल्यानंतर कमिशन व भरलेले एक कोटी रुपये मिळतील, अशीही बतावणी करण्यात आली. नागपूरला तुम्हाला भाऊ मिळतील, ते ही रक्कम देतील, असेही सांगण्यात आले. त्यानुसार, आपली रोकड घेण्यासाठी पुरोहित नागपूरला आले. त्यांना विमानतळ परिसरात कुख्यात आंबेकर, रमेश पाटील (नाशिक, मुंबई) आणि सन्नी ऊर्फ विकास राजकुमार वर्मा (वय २९, रा. नटराज टॉकीजजवळ, नागपूर) हे तिघे भेटले. त्यांच्याकडून दहाची अर्धी नोट घेतल्यानंतर तुमची रक्कम तुम्हाला लकवरच मिळेल, असे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले. त्यानंतर रमेशने पुरोहित यांना फोन करून नागपूरची जमीन आणि एक कोटी रुपये विसरून जा. तुम्ही ब्लॅकमनी बाळगता, हवालाने व्यवहार करता, याची माहिती उघड केली तर तुमच्या अडचणी वाढतील, असे सांगून कारवाईचा धाक दाखविण्यात आला. पुरोहितांनी विरोध केला असता जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

आंबेकरवर गुन्हे शाखेत उपचार
हवालाचा व्यवहार आणि जीवे मारण्याची धमकी या दोन्हीमुळे पुरोहित हादरले अन् गप्प बसले. त्यामुळे आंबेकर टोळी बिनधास्त होती. मात्र, जिगर पटेल यांचे प्रकरण उघड झाल्यानंतर पोलिसांनी आंबेकरला त्याच्या भाच्यासह अटक केल्याने या टोळीच्या तावडीत सापडलेल्यांना मानसिक बळ मिळाले. त्यामुळे पुरोहित यांनी नागपूर पोलिसांशी संपर्क करून आपली कैफियत ऐकवली. पोलिसांनी त्यांचीही तक्रार नोंदवून घेतली. जिगर पटेल प्रकरणात पोलिसांच्या कस्टडीला चुकविण्यासाठी मेडिकलमध्ये पोहचलेल्या आंबेकरला गुन्हे शाखेने आज पुन्हा ताब्यात घेतले. त्याला आणि नीलेश केदारला कोर्टात हजर करून त्यांचा २३ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला. दुसरीकडे सोनेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्ह्यात आंबेकरचा ‘भांजा’ सन्नी वर्मा याला पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी अटक केली. गुन्ह्याची उकल करण्यासाठी या तीनही मामा-भाच्यावर पोलीस वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार करीत आहेत. दरम्यान, अशा प्रकारचे आणखी अनेक गुन्हे लवकरच उघड होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

Web Title: Another case was registered against Nagpur's Don Ambekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.