अनियंत्रित बाेलेराेने शतपावली करणाऱ्या तिघांना उडविले; एकाचा मृत्यू, दाेघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 21:20 IST2022-10-01T21:19:37+5:302022-10-01T21:20:07+5:30
Nagpur News रात्रीचे जेवण आटाेपल्यानंतर शतपावली करणाऱ्या तिघांना अनियंत्रित बाेलेराेने धडक देत उडविले.

अनियंत्रित बाेलेराेने शतपावली करणाऱ्या तिघांना उडविले; एकाचा मृत्यू, दाेघे गंभीर जखमी
नागपूर: रात्रीचे जेवण आटाेपल्यानंतर तिघे मित्र नेहमीप्रमाणे गावाजवळून गेलेल्या राेडलगत शतपावली करीत हाेते. त्यातच वेगात आलेल्या बाेलेराेने त्या तिघांनाही धडक देत उडविले. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दाेघे गंभीर जखमी झाले. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कुही-उमरेड राेडवरील सालई गावाजवळ शुक्रवारी (दि. ३०) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
मिलिंद नारायण श्रीरामे (३०, रा. सालई, ता. उमरेड) असे मृताचे नाव असून, अक्षय ज्ञानेश्वर चौधरी (२२, रा. माथनी, ता. मौदा) व नयन राजेश पाठक (२५, रा. सालई, ता. उमरेड) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तिघेही मित्र असून, अक्षय सालई येथे पाहुणा म्हणून आला हाेता. रात्रीचे जेवण आटाेपल्यानंतर ते कुही-उमरेड राेडलगत शतपावली करीत गप्पा मारत हाेते. त्यात मागून म्हणजे उमरेडहून कुहीच्या दिशेने वेगात जाणाऱ्या एमएच-४०/सीडी-३२५८ क्रमांकाच्या बाेलेराेने त्यांना जाेरात धडक दिली आणि वाहन लगेच निघून गेले.
अपघात हाेताच नागरिकांनी तिघांना कुही येथील ग्रामीण रुग्णालयात आणले व पाेलिसांना माहिती दिली. तिथे डाॅक्टरांनी मिलिंद श्रीरामे यास तपासणीअंती मृत घाेषित केले तर अक्षय चाैधरी व नयन पाठक यांच्यावर उपचाराला सुरुवात केली. त्या दाेघांची प्रकृती स्थिर व धाेक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
वाहन चालकाचा शाेध सुरू
पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व वाहन चालकाविरुद्ध भादंवि ३०४ (अ), २७९, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. ते वाहन संदीप हरिभाऊ गोठे (३०, रा. कुही) हा चालवित असल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी त्याच्या विराेधात गुन्हा नाेंदवून त्याचा शाेध घेणे सुरू केले आहे, अशी माहिती ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी दिली.