वृद्ध महिला पडली, कार पडली... पुढचा नंबर कुणाचा? जीर्ण पुलाच्या प्रश्नावर युवकाचे अनोखे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:36 IST2025-12-29T11:36:14+5:302025-12-29T11:36:45+5:30
घाण पाण्यात उतरून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध; ब्रिटिशकालीन पुलावर मृत्यूचा सापळा

वृद्ध महिला पडली, कार पडली... पुढचा नंबर कुणाचा? जीर्ण पुलाच्या प्रश्नावर युवकाचे अनोखे आंदोलन
क्षितिजा देशमुख
केळवद, (नागपूर) : नागपूर–छिंदवाडा राष्ट्रीय महामार्गावरील केळवद गावातील पुलावर सुरक्षा कठडे नसल्यामुळे सातत्याने अपघात घडत असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ युवक अक्षय भुजाडे यांनी रविवारी सकाळी अकरा वाजता थेट नाल्यात उतरून अनोखे आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. केळवद गाव दोन भागांत विभागले गेले असून ग्रामपंचायत, बाजारपेठ व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी नागरिकांना याच पुलावरून ये-जा करावी लागते. मात्र पुलावर आजतागायत कोणतेही सुरक्षा कठडे नसल्याने लहान मुले, वृद्ध आणि वाहनचालकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे.
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास एक वृद्ध महिला या पुलावरून थेट नाल्यात कोसळली होती. वेळीच अक्षय भुजाडे व ग्रामस्थांनी धाव घेऊन तिचा जीव वाचवला. त्यानंतर ग्रामपंचायतीकडे तातडीने तात्पुरते तरी कठडे बसवावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
शनिवारी पुन्हा एक गंभीर घटना घडली. एका चारचाकी वाहनाचा तोल जाऊन ते थेट नाल्यात कोसळले. ग्रामस्थांच्या मदतीने वाहन बाहेर काढण्यात आले. वारंवार अपघात होऊनही प्रशासनाकडून केवळ दुर्लक्षच सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अक्षय भुजाडे यांनी थेट नाल्यात उतरून आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत ग्रामपंचायत लेखी स्वरूपात तातडीने सुरक्षा कठडे बसविण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत सचिवांनी दूरध्वनीवरून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली असली तरी आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिले आहेत. सोमवारी केळवद पोलीस ठाण्यात निवेदन देऊन, भविष्यात या ठिकाणी एखादी दुर्दैवी घटना घडून जीवितहानी झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, “आधी दुर्घटना, मग कारवाई?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पुलावर सुरक्षा कठडे बसवावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.