फुग्यातून कारागृहात गांजा नेण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 22:33 IST2023-06-14T22:32:47+5:302023-06-14T22:33:14+5:30
Nagpur News कारागृहात फुग्याच्या माध्यमातून गांजा नेण्याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी एका युवकाला २६ ग्रॅम गांजासह न्यायालय परिसरातून अटक केली.

फुग्यातून कारागृहात गांजा नेण्याचा प्रयत्न फसला
नागपूर : मध्यवर्ती कारागृहात गांजा पुरविणारे रॅकेट पकडले गेल्यानंतर खळबळ उडाली होती. आता सर्व ‘ऑल इज वेल’ असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असतानाच कारागृहात फुग्याच्या माध्यमातून गांजा नेण्याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी एका युवकाला २६ ग्रॅम गांजासह न्यायालय परिसरातून अटक केली.
करण विनोद पाटील (२४, रा. बेझनबाग, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. करण पाटील हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्याचा भाऊसुद्धा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. मंगळवारी पाचपावलीतील कुख्यात गुुंड सागर याची न्यायालयात हजेरी होती. करण व सागर एकत्रच कारागृहात असताना त्यांची मैत्री झाली होती. करण पाटील हा चार फुग्यांत गांजा भरून न्यायालय परिसरात उभा होता. कालूमार्फत कारागृहात गांजा पोहोचविण्यात येणार होता. पोलिसांना बघून करण लपला व त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिस हवालदार सुनील तिवारी यांनी पाठलाग करून करणला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, गांजा सापडला. सागर हा गुप्तांगात फुगे भरून कारागृहात गांजा नेणार होता, अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली.