नागपूरनजीक हिंगण्यात ‘ईव्हीएम’ विरोधात सर्वपक्षीय मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:40 IST2018-07-25T22:39:07+5:302018-07-25T22:40:52+5:30
वानाडोंगरी नगर परिषदेचा निवडणूक निकाल मंगळवारी घोषित करण्यात आला. त्यात २१ पैकी १९ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. भाजपविरोधात लाट असताना एवढे उमेदवार निवडून येणे अशक्य आहे, असे सांगत सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी सर्वपक्षीय मोर्चा काढला. ‘ईव्हीएम’ (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) ऐवजी बॅलेट पेपरने मतदान घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नागपूरनजीक हिंगण्यात ‘ईव्हीएम’ विरोधात सर्वपक्षीय मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वानाडोंगरी नगर परिषदेचा निवडणूक निकाल मंगळवारी घोषित करण्यात आला. त्यात २१ पैकी १९ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. भाजपविरोधात लाट असताना एवढे उमेदवार निवडून येणे अशक्य आहे, असे सांगत सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी सर्वपक्षीय मोर्चा काढला. ‘ईव्हीएम’ (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) ऐवजी बॅलेट पेपरने मतदान घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळाने नगर परिषदेत मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांच्यानंतर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार प्रीती डुडुलकर यांच्याकडे निवेदन सादर केले. या मोर्चामुळे वानाडोंगरीत वातावरण चांगलेच तापले. दुसरीकडे सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी ‘वानाडोंगरी बंद’चे आवाहन केले आहे.
वानाडोंगरी नगर परिषदेची पहिली सार्वत्रिक निवडणूक होऊन मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला. ही निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली. आधी निवडणूक कार्यक्रमानुसार १५ जुलैला मतदान होणार होते. मात्र पाच उमेदवारांचे अर्ज बाद केल्याने न्यायालयापर्यंत धाव घेतली. मात्र तो निकाल उमेदवारांच्या विरोधात गेला. असे असले तरी निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी पाहता सुधारित निवडणूक कार्यक्रम जारी करून चार दिवस वाढविले. यानुसार १९ जुलैला मतदान होते. परंतु तेथे ३० बूथवर मतदान झाले आणि ५ बूथवरील ईव्हीएम बदलण्यात आल्याने आक्षेप घेतला. परिणामी पुन्हा चार दिवसाने पाच बूथवर मतदान घेण्यात आले.
मतदान झाल्यानंतर मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला. मात्र २१ पैकी १९ जागांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला. त्यामुळे ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय नेते एकवटले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीवनगर येथून मोर्चा सुरू केला. नगर परिषदेवर हा मोर्चा पोहोचताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ईव्हीएम घोळामुळेच भाजपचा विजय झाला, असा आक्षेप घेत मुख्याधिकाऱ्यांकडे शिष्टमंडळाने निवेदन सोपविले.
त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. तहसील कार्यालय परिसरात माजी मंत्री रमेश बंग यांनी ही निवडणूक रद्द करून नव्याने बॅलेट पेपरने निवडणूक घेण्याची मागणी केली. सोबतच भविष्यातील सर्वच निवडणुका या बॅलेट पेपरच्या साहाय्याने घेण्यात याव्यात, अशी मागणी केली. नायब तहसीलदारांकडे शिष्टमंडळाने निवेदन सोपविले. यावेळी काँग्रेसचे बाबा आष्टणकर, संजय जगताप, शिवसेनेचे नंदू कन्हेर, मनसेचे दीपक नासरे, बसपचे शेंडे, जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे, राष्ट्रवादीचे प्रवीण खाडे, गोवर्धन प्रधान, संतोष कन्हेरकर, पुरुषोत्तम डाखळे यांच्यासह मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.