मुंबईतून पाठविण्यात आला अलर्ट! प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर कडक बंदोबस्त
By नरेश डोंगरे | Updated: January 25, 2026 21:25 IST2026-01-25T21:24:44+5:302026-01-25T21:25:18+5:30
गणराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर, नागपूर, सेवाग्रामसह विदर्भातील अन्य काही रेल्वे स्थानकावर कोणतीही गडबड किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून दिल्ली, मुंबईतून 'अलर्ट' मिळाला आहे.

मुंबईतून पाठविण्यात आला अलर्ट! प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर कडक बंदोबस्त
- नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेचा ईशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील विविध रेल्वे स्थानकांवर, परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. हेच नव्हे तर अनेक ठिकाणच्या रेल्वे पुलांवर, बोगद्यांवरही नजर रोखण्यात आली आहे.
महाराष्ट्रच नव्हे तर देशातील एक अत्यंत महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून नागपूर रेल्वे स्थानकाचा उल्लेख होतो. देश विघातक शक्तींच्या टार्गेटवर असल्याने नागपूर रेल्वे स्थानकाचा समावेश संवेदनशिल स्थानकांमध्ये आहे. गणराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर, नागपूर, सेवाग्रामसह विदर्भातील अन्य काही रेल्वे स्थानकावर कोणतीही गडबड किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून दिल्ली, मुंबईतून 'अलर्ट' मिळाला आहे. त्यामुळे नागपूर विदर्भातील सर्व प्रमुख व संवेदनशील रेल्वे स्थानकांवर आज दुपारपासूनच सिक्युरिटी टाईट करण्यात आली आहे.
रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वान पथकाकडून रेल्वे स्थानके, रेल्वे परिसर तसेच गाड्यांमध्ये कसून तपासणी केली जात आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. मुख्य रेल्वे स्थानक, अजनी रेल्वे स्थानक, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकावरच्या सुरक्षा व्यवस्थेची सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी केली. यावेळी रेल्वे पोलिस, अधिकारी, सीआयबी, श्वान पथकाने प्लॅटफॉर्म, सर्क्युलेटिंग एरिया, यार्ड, पार्किंग, सायकल स्टँड तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली.
प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन
रेल्वे स्थानक परिसरातील ऑटोचालक, कुली, अधिकृत विक्रेते यांच्यासोबत बैठका घेऊन कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ रेल्वे सुरक्षा दल किंवा शासकीय रेल्वे पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेचे संवेदनशील विभाग, पूल, बोगदे तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवरही गस्त घालण्यात येत आहे. सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली (पीए सिस्टीम)च्या माध्यमातून प्रवाशांना सतर्क व जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्व स्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.