अजनीचे 'लोको कॅब मॉडिफिकेशन' देशात दुसऱ्या स्थानी
By नरेश डोंगरे | Updated: May 25, 2025 19:31 IST2025-05-25T19:31:08+5:302025-05-25T19:31:18+5:30
अत्याधुनिक सुविधा : कानपूर सेंट्रल आणि विशाखापट्टणम-वाल्टेयर विभागालाही मान

अजनीचे 'लोको कॅब मॉडिफिकेशन' देशात दुसऱ्या स्थानी
नरेश डोंगरे/ नागपूर : रेल्वेच्या सर्वोत्तम लोको कॅब मॉडिफिकेशन स्पर्धेत अजनी लोको शेडला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हा राष्ट्रीय सन्मान अजनी लोको शेडला कानपूर सेंट्रल आणि विशाखापट्टनम वाल्टेयर सोबत मिळाला.
बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स येथे राष्ट्रीय स्तरावरची सर्वोत्तम लोको कॅब मॉडिफिकेशन स्पर्धा पार पडली. भारतीय रेल्वेतील नवनवीन उपक्रम, सुधारणा आणि चालकांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सुविधा आदी मुद्द्यांवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यात अजनीच्या ईलेक्ट्रीक लोको कॅबमध्ये (लोको क्र. ३३३३०/ डब्ल्यूएजी-९ एचसी) उच्च हॉर्सपॉवर असलेल्या ब्रॉड गेज एसी मालवाहू, इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हमध्ये भर देण्यात आला. या लोको कॅबमध्ये लोकोचे सुशोभिकरण आणि वेगवेगळ्या अद्ययावत सुधारणा करण्यात आल्या. त्यात नवीन रंगकाम, उन्नत पॅनेलिंग, नव्याने डिझाइन केलेला डॅशबोर्ड, आणि उष्णतारोधक फॅब्रिक हेडलाइनरचा समावेश आहे. फोल्डेबल परदे, रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह बँड्स, एलईडी लायटिंग आणि ऑटोमॅटिक परफ्युम डिस्पेन्सर ही आणखी काही येथील वैशिष्ट्ये आहेत.
या सोबतच संचालन कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सहाय्यक लोको पायलटसाठी दुसरे डिस्प्ले आणि डायग्नोस्टिक युनिट, पॉलीकार्बोनेट लूकआउट ग्लास, इलेक्ट्रिक वायपर, झटपट माहिती मिळवण्यासाठी क्यूआर कोड्स, उष्णता प्रतिरोधक छताचे रंग, एलईडी हेडलाईट्स, आणि क्रू व्हॉइस तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग सिस्टम, रीयल टाइम डेटा अक्विजिशन सिस्टम, रिमोट डायग्नोस्टिक सिस्टम, तसेच रीयल टाइम ट्रेन प्रणालीचा त्यात समावेश आहे.
शिवाय लोको पायलटला बसण्यासाठी आरामदायक जागा, हाय स्पीड फॅन, एसी, कूल बॉक्स, सन व्हायझर आणि भरपूर स्टोरेजचीही व्यवस्था येथे करण्यात आली आहे. कॅब, मशीन रूम आणि अंडरफ्रेममधील उपकरणांना स्पष्ट लेबल लावल्यामुळे देखभाल करणे अधिक सहज होत आहे. या सर्व सोयी-सुविधा आणि सुशोभिकरणाच्या आधारे अजनी लोको कॅबला हा राष्ट्रीय स्तरावरचा सन्मान मिळाला आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी आनंद
राष्ट्रीय स्तरावरचा सन्मान प्राप्त झाल्यामुळे अजनी लोको कॅब मधीलच नव्हे तर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी आनंद निर्माण झाला आहे.