अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 05:52 IST2025-09-20T05:49:55+5:302025-09-20T05:52:56+5:30

यापुढे मंत्र्यांना तीन दिवस मुंबईत, एक दिवस मतदारसंघात व तीन दिवस पक्षासाठी द्यावे लागतील. जे मंत्री वेळ देणार नाहीत त्यांना खुर्ची खाली करावी लागेल. दुसऱ्यांना संधी देऊ, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वपक्षीय मंत्र्यांना दिली.

Ajit Pawar's warning to ministers, if you don't have time, vacate the chair; Strong words delivered at Chintan Shibir | अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल

अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल

नागपूर : ज्यांना पालकमंत्रिपद मिळाले त्यांना तेथे जावेच लागेल. मंत्र्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सोबत घेऊन फिरा. काही मंत्री जिल्हाध्यक्षांना विचारत नाही. असे चालणार नाही. यापुढे मंत्र्यांना तीन दिवस मुंबईत, एक दिवस मतदारसंघात व तीन दिवस पक्षासाठी द्यावे लागतील. जे मंत्री वेळ देणार नाहीत त्यांना खुर्ची खाली करावी लागेल. दुसऱ्यांना संधी देऊ, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वपक्षीय मंत्र्यांना दिली.

अजित पवार गटाचे चिंतन शिबिर शुक्रवारी नागपुरात पार पडले. यावेळी अजित पवार यांनी मंत्र्यांचा चांगलाच क्लास घेतला. ते म्हणाले, काही लोक काही काम न करता प्रसिद्धी घेतात. माझ्यासह सर्वांनी जमिनीवर सक्रिय राहा. यापुढे प्रत्येक जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी जनसंवाद घेऊ. संघटनात्मक पद भरती करू. पद भरली पण अपेक्षा पूर्ण होत नाही तेथे फेरविचार करू, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. पक्ष प्रवेश देताना त्या व्यक्तीची प्रतिमा जनमानसात चांगली असावी हे आधी तपासा, असा सल्लाही त्यांनी दिला.

पुढे विमानासारखे दरवाजे बंद करू

शिबिराची सुरुवात सकाळी ९:३० वाजता झाली. यावेळी बहुतांश मंत्री व आमदार उपस्थित नव्हते. यावर अजित पवार यांनी उघड नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, पक्ष एक दिवस बोलवतो आणि आपण वेळेवर येत नाही. यापुढे ९:३० वाजताच विमानासारखे दरवाजे बंद करू. जे उशिरा येतील त्यांना बाहेरच राहू द्या. त्यांना वेळेच महत्त्व कळू द्या.

शिबिरात राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ, अदिती तटकरे यांच्यासह पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Ajit Pawar's warning to ministers, if you don't have time, vacate the chair; Strong words delivered at Chintan Shibir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.