विदर्भात भाजपचा हात आखडता, अजित पवार गटाला एकच जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 07:12 AM2024-02-04T07:12:20+5:302024-02-04T07:12:58+5:30

चार जागांवर दावा; भाजपचीही समांतर ‘फिल्डिंग’ जोरात

Ajit Pawar's group wins only one seat in Vidarbha | विदर्भात भाजपचा हात आखडता, अजित पवार गटाला एकच जागा

विदर्भात भाजपचा हात आखडता, अजित पवार गटाला एकच जागा

कमलेश वानखेडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील लोकसभेच्या १० पैकी कमीत कमी जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेनेला सोडण्याचा भाजप नेत्यांचा विचार आहे. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप भंडारा-गोंदियाची जागादेखील स्वत: लढविण्याच्या विचारात आहे. अजित पवार गटाला फार तर एक जागा पदरी पाडून घेण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.

सन २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला भंडारा-गोंदिया, अमरावती व बुलढाणा या तीन जागा सोडण्यात आल्या होत्या. अमरावती येथे खासदार नवनीत राणा यांना राष्ट्रवादीने समर्थन दिले होते. भंडारा-गोंदिया व बुलढाणाची जागा राष्ट्रवादी हरली. अमरावतीत खासदार राणा विजयी झाल्या. आता महायुतीत  या तीन जागांवर अजित पवार गटाने दावा केला आहे. सोबतच गडचिरोली मतदारसंघातून मंत्री धर्मरावबाबा आत्राम लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी त्या दिशेने कामही सुरू केले आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी केली; पण ते स्वत: या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरतील की नाही, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. 

भाजपने मात्र या मतदारसंघात जोरात तयारी सुरू केली आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणाऱ्या युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत राणा यावेळी अजित पवार गटातून लढतील की भाजपकडून हे त्यांनीदेखील स्पष्ट केलेले नाही. 

संघटनात्मक मजबूत करण्यासाठी भाजप जास्त तडजोडीच्या मूडमध्ये दिसत नाही. अजित पवार गटाला एखाद्या जागेवर समाधान मानावे लागेल.

Web Title: Ajit Pawar's group wins only one seat in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.