मांढळ : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मांढळ येथील प्रभाकर गाेंदेवार यांच्या शेतात शेतजमीन आराेग्य पत्रिका कार्यक्रमाचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात शेतकऱ्यांना जमिनीचे आराेग्य व इतर महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी प्रदीप पाेटदुखे यांनी शेतकऱ्यांना सेंद्रीय खताचा फायदा व वापर, माती परीक्षणाचे महत्त्व व त्यासाठी घ्यावयाचे मातीचे नमुने, जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबाेळी अर्क तयार करण्याची पद्धत, जमिनीचा सामू, त्यावर अवलंबून आलेली पीक, पिकांना लागणारे अन्नद्रव्य, त्यांची अन्नद्रव्य ग्रहण करण्याची क्षमता, ओलिताच्या जमिनीचा सामू, गांडूळ खत, यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर विस्तृत मार्गदर्शन केले. नेहा नेहारे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयाेजनाचा उद्देश स्पष्ट केला. नामदेव लांजेवारी यांनी प्रात्यक्षिकांद्वारे शेतीविषयक माहिती दिली. संचालन व आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक अविनाश दुधबर्वे यांनी केले. कार्यक्रमाला उपसरपंच सुखदेव जीभकाटे, केशव लुटे, गोपीचंद सोनकुसरे, विठोबा काळे, राजू भोज, नत्थू वाघमारे यांच्यासह स्थानिक व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.