रामटेकनंतर बच्चू कडूंचा नागपुरातही महायुतीवर प्रहार; काँग्रेसच्या विकास ठाकरेंना समर्थन
By कमलेश वानखेडे | Updated: April 13, 2024 18:29 IST2024-04-13T18:29:02+5:302024-04-13T18:29:23+5:30
काँग्रेसच्या हजारीपहाड येथील सभेत प्रहारचे नागपूर शहर अध्यक्ष अमोल इसपांडे यांनी काँग्रेस नेत्यांकडे समर्थनाचे पत्र सोपविले. भाजपने सहकारी पक्षांना योग्य सन्मान दिला नाही.

रामटेकनंतर बच्चू कडूंचा नागपुरातही महायुतीवर प्रहार; काँग्रेसच्या विकास ठाकरेंना समर्थन
नागपूर : आ. बच्चू कडू यांनी महायुतीवर आणखी तीव्र प्रहार केला आहे. अमरावतीमध्ये प्रहारचा उमेदवार रिंगणात उतरविल्यानंतर रामटेकमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. आता आ. कडू यांनी नागपूरच्या निवडणुकीतही उडी घेत काँग्रेसचे उमेदवार आ. विकास ठाकरे यांनाही पाठिंबा जाहीर केला आहे.
काँग्रेसच्या हजारीपहाड येथील सभेत प्रहारचे नागपूर शहर अध्यक्ष अमोल इसपांडे यांनी काँग्रेस नेत्यांकडे समर्थनाचे पत्र सोपविले. भाजपने सहकारी पक्षांना योग्य सन्मान दिला नाही. आ. बच्चू कडू यांना अपमान करणाऱ्या खा. नवनीत राणा यांना भाजपचे तिकीट दिले. भाजपला चढलेली सत्तेची नशा उतरविण्यासाठी प्रहारतर्फे समर्थन देत असल्याचे इसपांडे यांनी जाहीर केले. नागपुरात काँग्रेसला प्रहारचा पाठिंबा देऊन आ. बच्चू कडू यांनी महायुतीत परतीचे दोर कापल्याचे स्पष्ट झाले आहे.
रामटेक मतदारसंघात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. भाजपची साथ सोडत कन्हानचे माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे हे वंचित बहुजन आघाडीत सहभागी झाले होते. त्यानंतर चहांदे यांना रामटेक लोकसभेची वंचितची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, दोन दिवसांनीच काँग्रेसला रामराम ठोकत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले किशोर गजभिये यांना वंचितने पाठिंबा जाहीर केला. सोबत चहांदे हे आता गजभिये यांना समर्थन देत असून त्यांचा प्रचार करतील, असेही सांगण्यात आले होते. वंचितने पाठिंबा काढल्यामुळे चहांदे दुखावले. खरबी बहादुरा येथे शुक्रवारी रात्री आयोजित सभेत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.
संविधान वाचविण्यासाठी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन समर्थन देत आहोत, अशी भूमिका चहांदे यांनी यावेळी मांडली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, जि.प. चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, शिंदे सेनेचे माजी खा. प्रकाश जाधव, जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले, अवंतिका लेकुरवाळे, अजय राऊत आदी उपस्थित होते.