नागपूर : वीजबिलांच्या माफीवरुन राज्यातील राजकारण तापले असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता उपमुख्यमंत्र्यांकडे बोट दाखविले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच एमईआरसीला बिलमाफीसंदर्भात काय करावे यासंदर्भात विचारणा केली होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे बिलमाफीबाबत मी बोललो. ते माझे व्यक्तिगत मत नव्हते, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
ऊर्जामंत्री राऊत यांनी माफीची घोषणा करण्यापूर्वी चर्चा करायला हवी होती. ती चूक झाली,असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतेच केले. त्यावर राऊत म्हणाले, अशोक चव्हाण आमचे नेते आहेत. पण वीजबिलमाफीसंदर्भात पहिली बैठक अजित पवार यांनी घेतली. त्यावेळी चव्हाण उपस्थित नव्हते. त्यामुळे बैठकीतील माहिती चव्हाण यांना नव्हती. एमईआरसीला अजित पवार यांनी फोन करून विचारणा केली. बिल माफीसाठी काय करावे याबाबत चर्चा केली. त्यानंतर प्रस्ताव आमच्याकडे पाठवला व कॅबिनेटसमोर मांडायला सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी प्रतिक्रिया दिली, असे राऊत यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाच्या चार बैठका घेतल्या. वेगवेगळे प्रस्ताव मागण्यात आले. खुद्द मुख्यमंत्र्यांनी तीन वेळा बैठका घेतल्या व आठ वेळा कॅबिनेट नोटदेखील बनविल्या, अशी माहितीदेखील राऊत यांनी दिली.
Web Title: After the Deputy Chief Minister said, we talked about electricity bill waiver
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.