कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
By योगेश पांडे | Updated: May 21, 2025 00:16 IST2025-05-21T00:15:24+5:302025-05-21T00:16:46+5:30
चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडीतील गामरेंट केंद्रासह महिलांच्या प्रकल्पांच्या कामाला गती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
योगेश पांडे, नागपूर
कोराडी येथे महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत (माविम) सुरू असलेल्या प्रकल्पांना तसेच गारमेंट केंद्राच्या कामाला गती देण्याचे निर्देश महसूलमंत्री व नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तसेच या कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मंत्रालयातील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या दालनात मंगळवारी कोराडीतील माविम प्रकल्पांच्या प्रगतीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मंत्री आदिती तटकरे यांच्यासह सचिव डॉ. अनुपकुमार यादव, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, विभागाचे सहसचिव वी. रा. ठाकूर, महाव्यवस्थापक रवींद्र सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोराडीत माविमअंतर्गत वस्त्रप्रक्रिया प्रकल्प, निर्माल्यापासून अगरबत्ती निर्मिती, प्रदूषणविरहित कलमकारी आणि वस्त्रप्रक्रिया प्रकल्प तसेच सॅनिटरी नॅपकिन निर्मिती असे विविध प्रकल्प राबविले जात आहेत. हे प्रकल्प ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे सुमारे २०० महिलांना रोजगार मिळणार आहे.
महिलांसाठीचे प्रकल्प वेगाने पूर्ण करणे माझी प्राथमिकता आहे. या प्रकल्पांद्वारे महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम बनवले जाईल. या प्रकल्पांना प्रकल्पांना निधीची कमतरता भासणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षणासाठी महिलांना नियमित सहा महिन्यांचे प्रशिक्षण आणि त्यासाठीचे विद्यावेतन वेळेत मिळावे, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
आदिती तटकरे यांनी कोराडी येथील गारमेंट केंद्राच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. या केंद्रात बचत गटातील महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे. हे केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी एकच निविदा प्रक्रिया राबवावी आणि ठरलेल्या कालमर्यादेत केंद्र कार्यान्वित करावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बावनकुळे यांनी प्रकल्पांच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक ताकीद दिली. प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.