गर्दीवर फटाके फेकणाऱ्या पाच तरुणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:57 IST2025-02-25T16:56:23+5:302025-02-25T16:57:04+5:30
Nagpur : सामन्यानंतरच्या विजयी सेलिब्रेशनवेळी गोंधळ

Action taken against five youths who threw firecrackers at the crowd
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर लक्ष्मीभुवन चौकात नागपूरकरांनी जोरदार जल्लोष केला. मात्र, काही अतिउत्साही तरुणांनी या जल्लोषाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सेलिब्रेशनच्या नावाखाली गोंधळ घातला व गर्दीवर फटाकेदेखील फेकले. पोलिसांनी पाच तरुणांवर कारवाई केली आहे.
सिम्पू धनराज रहांगडाले (१९, समतानगर नारी रोड), साहिल मनोज साहू (२०, वर्मा लेआउट, अंबाझरी), भावेश मगनभाई पटेल (३५, कुंज बिहारी अपार्टमेंट, लकडगंज), कर्णव जितेंद्र पटेल (२८) आणि आदित्य प्रज्वल फुलजेवार (२५, वरोरा, चंद्रपूर), अशी आरोपींची नावे आहेत. सामना संपल्यावर रात्री ११ वाजता वेस्ट हायकोर्ट रोडवरील लक्ष्मी भवन चौकात हजारो लोकांची गर्दी जमली होती. आरोपीदेखील गर्दीत उपस्थित होते. आरोपी फटाके पेटवत होते आणि एकमेकांवर फेकत होते. यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. अशी परिस्थिती पाहून पोलिस नागरिकांना संयमाने सेलिब्रेशन करण्याचे आवाहन करत होते. मात्र, आरोपींचा गोंधळ सुरूच होता. त्यांचा एका व्यक्तीशी वाददेखील झाला. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांशीदेखील हुज्जत घातली. अखेर पोलिस कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त कुमक बोलावली आणि आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना अंबाझरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.