नागपुरात डोकेदुखी ठरलेल्या बुलेट चालकांवर कारवाई : १०६ बुलेट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:47 IST2019-04-18T23:46:10+5:302019-04-18T23:47:01+5:30
सायलेन्सरचा आवाज मोठा करून रहदारी करणाऱ्या आणि फटाक्याचा आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांच्याविरोधात वाहतूक पोलीस विभागाने कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी अशी १०६ वाहने जप्त करण्यात आली, तर ३१० वाहन चालकांच्या हातात चालान दिले.

नागपुरात डोकेदुखी ठरलेल्या बुलेट चालकांवर कारवाई : १०६ बुलेट जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सायलेन्सरचा आवाज मोठा करून रहदारी करणाऱ्या आणि फटाक्याचा आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांच्याविरोधात वाहतूक पोलीस विभागाने कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी अशी १०६ वाहने जप्त करण्यात आली, तर ३१० वाहन चालकांच्या हातात चालान दिले.
वाहतूक नियमांना धारेवर धरीत काही बुलेट चालकांची अरेरावी वाढली आहे. सायलेन्सरमध्ये बदल करून वाहनचालक वाहनाचा आवाज वाढवितात. कर्कश आवाजामुळे इतर चालकांना वाहन चालविणे कठीण जाते. काही वाहन चालक फटाके फोडणारे आवाज काढतात. अचानक होणाऱ्या या आवाजामुळे वाहनचालक दचकून अपघात होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे, असे बुलेट चालक अतिवेगाने वाहन चालवित असल्याने वाहतूक पोलिसांना त्यांना पकडणेही कठीण जात होते. यामुळे अनेक दिवसांपासून बुलेट चालक डोकेदुखी ठरत होते. याची दखल पोलीस आयुक्त डॉ.बी. के. उपाध्याय यांनी घेतली. त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त (वाहतूक) गजानन राजमाने यांनी गुरुवारी ही विशेष मोहीम हाती घेतली. पहिल्याच दिवशी १०६ बुलेट जप्त तर ३१० वाहन चालकांना चालान दिल्याने चालकांमध्ये खळबळ उडाली. ही कारवाई पुढील काही दिवस चालणार असल्याचे राजमाने यांनी सांगितले.