पाच वर्षांच्या मुलीसमोर वडिलांचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2023 20:55 IST2023-04-27T20:54:42+5:302023-04-27T20:55:13+5:30
Nagpur News एका पाच वर्षांच्या मुलीसमोरच तिच्या वडिलांना अज्ञात वाहनचालकाने चिरडले. बेलतरोडीच्या खापरी नाक्याजवळ बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

पाच वर्षांच्या मुलीसमोर वडिलांचा अपघाती मृत्यू
नागपूर : एका पाच वर्षांच्या मुलीसमोरच तिच्या वडिलांना अज्ञात वाहनचालकाने चिरडले. बेलतरोडीच्या खापरी नाक्याजवळ बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. अतुल भागवत बांते (वय ३१, खापरी पुनर्वसन) असे मृताचे नाव आहे.
अतुल आणि त्यांची पत्नी एका खासगी रुग्णालयात काम करतात. त्यांना १८ महिने आणि पाच वर्षांची अशा दोन मुली आहेत. ड्युटी संपल्यानंतर अतुल यांची पत्नी सायंकाळी बसने खापरीला यायची व अतुल त्यांना घ्यायला जायचे. नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी पाच वाजता अतुल आपल्या पाच वर्षांच्या मुलीला दुचाकीवर बसवून खापरी नाक्याजवळ पोहोचले. बस येणार असल्याने अतुल यांनी मुलीला दुचाकीवर बसवले आणि रस्ता ओलांडण्यास सुरुवात केली. तेव्हा खापरीकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने अतुल यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. हा अपघात पाहून दुचाकीवर बसलेली पाच वर्षांची मुलगी विचलित झाली. त्याचवेळी मार्गावरून येणारे सहायक पोलिस आयुक्त सचिन थोरबोले यांनी अतुल यांना त्यांच्या वाहनातून रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अतुल यांच्या मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लोकांनी कुटुंबीयांना माहिती दिली. बेलतरोडी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.