नागपूर जिल्ह्यातील लोहारीसावंगा येथे लाचखोर वनरक्षकावर एसीबीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 00:12 IST2021-02-13T00:08:52+5:302021-02-13T00:12:38+5:30
ACB action परवानगी नसताना ताेडलेली सागाची झाडे वन विभागाने ताब्यात घेतली. ती झाडे परत करण्यासाठी तसेच कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वनरक्षकाने लाच स्वीकारण्यास नकार दिला व ताे लगेच पळून गेला. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक (ॲन्टी करप्शन ब्युराे-एसीबी) विभागाच्या पथकाने त्याच्याविराेधात गुन्हा नाेंदविला.

नागपूर जिल्ह्यातील लोहारीसावंगा येथे लाचखोर वनरक्षकावर एसीबीची कारवाई
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : परवानगी नसताना ताेडलेली सागाची झाडे वन विभागाने ताब्यात घेतली. ती झाडे परत करण्यासाठी तसेच कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वनरक्षकाने लाच स्वीकारण्यास नकार दिला व ताे लगेच पळून गेला. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक (ॲन्टी करप्शन ब्युराे-एसीबी) विभागाच्या पथकाने त्याच्याविराेधात गुन्हा नाेंदविला. ही कारवाई जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील लाेहारीसावंगा येथे शुक्रवारी (दि. १२) करण्यात आली.
विजय भगवान मुंढे (२७) असे लाचखाेर वनरक्षकाचे नाव आहे. ताे वन विभागाच्या लाेहारीसावंगा (ता. नरखेड) येथील कार्यालयात कार्यरत आहे. त्याच्याकडे खराशी बीटची जबाबदारी साेपविली आहे. फिर्यादी भाटपुरा, काटाेल येथील रहिवासी असून, त्यांनी खराशी भागातील काही शेतकऱ्यांकडून सागासह इतर झाडे खरेदी करतात आणि ती ताेडण्यासाठी वन व महसूल विभागाने रितसर परवानगी मागतात. त्यांनी खराशी शिवारातील शेतकऱ्यांकडून सागाची झाडे खरेदी केली आणि ती ताेडली.
ती झाडे विनापरवानगी ताेडल्याचे सांगून वन विभागाने ती ताब्यात घेतली. या प्रकरणात केली जाणारी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तसेच ताेडलेली झाडे परत करण्यासाठी विजय मुंढे याने फिर्यादीला १० हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत नागपूर येथील एसीबीच्या कार्यालयात तक्रार नाेंदविली. त्याअनुषंगाने एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची खातरजमा करीत लाेहारीसावंगा येथील कार्यालय परिसरात सापळा रचला. मात्र, संशय आल्याने विजय मुंढे याने लाच स्वीकारण्यास नकार दिला व लगेच पळून गेला. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली नाही.
या कारवाईमुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विजय मुंढेच्या विराेधात जलालखेडा पाेलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ व याच अधिनियमातील संशाेधन २०१८ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. वृत्त लिहिस्ताे आराेपीस अटक करण्यात आली नव्हती. ही कारवाई एसीबीच्या पाेलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पाेलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार व मिलिंद ताेतरे, उपअधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनात एसीबीचे पाेलीस निरीक्षक दिनेश लबडे व संजीवनी थाेरात, शिपाई लक्ष्मण परतेती, अचल हरगुडे, रेखा यादव, प्रिया नेवारे यांच्या पथकाने केली.