नागपूर कारागृहात कैद्यांचा राडा; कुख्यात आबू खानला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2022 14:04 IST2022-09-14T14:01:13+5:302022-09-14T14:04:13+5:30
कारागृहात खळबळ

नागपूर कारागृहात कैद्यांचा राडा; कुख्यात आबू खानला मारहाण
नागपूर : मोबाइल, बॅटरी आणि गांजा आढळल्यामुळे वादात सापडलेले नागपूर मध्यवर्ती कारागृह परत एकदा चर्चेत आले आहे. कारागृहात बंद असलेल्या कुख्यात गुन्हेगार आबू खानला बाचाबाचीनंतर मारहाण करण्यात आली. नागपुरातीलच गुंड भुरूसोबत त्याची बाचाबाची झाली होती. या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली आहे.
मोक्काचा आरोपी असलेला आबू मागील चार महिन्यांपासून कारागृहात आहे. कारागृहात तो या अगोदरदेखील विविध कृत्यांमुळे चर्चेत राहिला आहे. सोमवारी काही कैदी आपापसात बोलत असताना, त्याने भुरूबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली. यावरून त्याच्यात व भुरूमध्ये वाद सुरू झाला. संतापलेल्या भुरूने त्याला मारहाण केली. इतरांनी मध्यस्थी करत दोघांना वेगळे केले. यानंतर, तपासणीसाठी आबूला कारागृह इस्पितळात नेण्यात आले.
या संदर्भात कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मारहाण झाली नसल्याचे सांगितले. दोन कैद्यांमध्ये क्षुल्लक गोष्टीवरून बाचाबाची झाली व त्यानंतर त्यांच्यात झटापट झाली, असा त्यांनी दावा केला.
मागील आठवड्यातच कारागृहात बॅटरी व गांजा नेताना एक कैदी आढळला होता. त्यानंतर, या प्रकरणात आठ जणांना अटक झाली व पोलिसांनी मोठी शोधमोहीम राबविली होती. यात मोबाइल व ५ ग्रॅम गांजा सापडला होता. ही घटना ताजी असताना या प्रकारामुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.