भोंदूबाबा खरातच्या नादाला लागून नागपुरातील महिलेने गमावले अडीच कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 16:27 IST2026-04-11T16:22:19+5:302026-04-11T16:27:00+5:30
Nagpur : वादाच्या भोवऱ्यात सापडलेला तथाकथित बाबा अशोक खरातच्या नादाला लागून नागपुरातील उच्चशिक्षित महिलेने अडीच कोटी रुपये गमावल्याची बाब समोर आली आहे.

A woman from Nagpur lost Rs 2.5 crore due to the sound of Bhondubaba Kharat
जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वादाच्या भोवऱ्यात सापडलेला तथाकथित बाबा अशोक खरातच्या नादाला लागून नागपुरातील उच्चशिक्षित महिलेने अडीच कोटी रुपये गमावल्याची बाब समोर आली आहे. खरातने आपल्या साथीदारांमार्फत तिला विधी विभागात उच्च पद मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, खरातचा एजंट आणि त्या महिलेमध्ये समेट झाला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, ती महिला खरातच्या संपर्कात बऱ्याच काळापासून होती. त्याला भेटण्यासाठी ती वारंवार नाशिकला जात असे. खरातच्या कथित भविष्यवाणी खऱ्या ठरल्यानंतर तिचा विश्वास वाढला होता. खरात अनेक प्रमुख राजकारणी, पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी, तसेच विधीक्षेत्रातील लोकांची चांगली ओळख असल्याने ती महिला त्याला गुरू मानू लागली. ती तिच्या पतीलाही खरातकडे घेऊन जाऊ लागली. तिचा पतीसुद्धा खरातच्या प्रभावाखाली आला. खरातने एका मोठ्या पदाचे आमिष दाखवून त्या महिलेला भुरळ घातली आणि त्यासाठी पाच कोटी रुपये लागतील, असे सांगितले. पैसे देण्यासाठी त्याने त्या महिलेची आणि तिच्या पतीची ओळख अहमदनगरचा रहिवासी असलेल्या त्याचा एजंट निरंजन याच्याशी करून दिली. निरंजनने स्वतःची ओळख एक न्यूरोलॉजिस्ट म्हणून करून दिली आणि दिल्लीच्या एम्समध्ये सहसंचालक म्हणून कार्यरत असल्याची बतावणी केली. निरंजन आणि त्याचे कुटुंबीय नियमितपणे तिच्या घरी येत असल्यामुळे, ती महिला त्याच्या जाळ्यात अडकली व तिने त्याला अडीच कोटी दिले.
मात्र, तिला कुठलेही पद मिळाले नाही. तिने खरात आणि निरंजन यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. खरातने निरंजनकडे अंगुलीनिर्देश केला आणि टाळाटाळ केली. त्या महिलेने निरंजनला पैसे परत करण्यास सांगितले. जेव्हा त्याने टाळाटाळ करणे सुरूच ठेवले, तेव्हा त्या महिलेने गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली.
नंतर कळले सूत्रधार होता खरात
पोलिस तपासात खरात हा या फसवणुकीमागील सूत्रधार असल्याचे उघड झाले. संभाव्य कायदेशीर कारवाईच्या भीतीने, खरातने निरंजनला त्या महिलेचे पैसे परत करून प्रकरण मिटवण्याचे निर्देश दिले. पैसे परत मिळाल्यावर, त्या महिलेने प्रकरण मिटवले आणि न्यायालयाकडून पोलिसांनी दाखल केलेले गुन्हा रद्द करवून घेतला.