आंदोलनामुळे रुसलेली लालपरी पुन्हा हसली; प्रवाशांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 14:49 IST2023-11-04T14:47:17+5:302023-11-04T14:49:49+5:30
दिवाळीनिमित्त वाढणार गर्दी

आंदोलनामुळे रुसलेली लालपरी पुन्हा हसली; प्रवाशांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : दोष नसतानाही आंदोलकांचा रोष व्यक्त होत असल्याने रुसलेली लालपरी आता पुन्हा हसू लागली आहे. आज सकाळपासून प्रवाशांना सामावून घेत तिची मोठ्या दिमाखात धावपळ सुरू झाली आहे.
गणेशपेठ आगारातून आज भल्या सकाळपासून सर्वच्या सर्व ५५ बस वेगवेगळ्या मार्गावरच्या प्रवाशांना घेऊन रवाना झाल्या, तर जिल्ह्यातील आठ आगारांतून एकूण ३३२ बसचेही संचलन सुरू झाले.
विशेष म्हणजे, मराठा आंदोलनामुळे ठिकठिकाणी एसटी बसवर रोष व्यक्त झाला. जाळपोळ तोडफोड होत असल्याने बसचे मोठे नुकसान होत असल्याचे पाहून विविध मार्गांवरील खास करून मराठवाड्याला जोडणाऱ्या भागाकडे धावणाऱ्या एसटी बसचे संचलन बंद करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटल्यामुळे अर्थात आंदोलनाला ब्रेक लागल्यामुळे एसटीचे ब्रेक सैल झाले. या पार्श्वभूमीवर सकाळपासून नागपूर जिल्ह्यातील आठही आगारांतून सर्वच्या सर्व बस आधीप्रमाणे विविध मार्गांवर रवाना करण्यात आल्या. सकाळपासूनच प्रवाशांनीही जवळपास सर्वच बसमध्ये गर्दी केल्याचे चित्र होते.
तिकीट कमी, प्रवासी जास्त
एसटी बसमध्ये विविध वर्गांतील प्रवाशांना प्रवास भाड्यात वेगवेगळी सवलत मिळत असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बसमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आधी खासगी वाहनाचे तिकीट (प्रवास भाडे) कमी आणि एसटीचे जास्त असे चित्र होते. मात्र, गेल्या मार्च महिन्यांपासून खासगी बसच्या तुलनेत एसटीचे प्रवास भाडे सवलतीमुळे कमी झाल्याने एसटी बसकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे.