अफगानिस्तानातील बामियानच्या बुद्ध मूर्तीची प्रतिकृती नागपुरात उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 16:44 IST2026-02-14T16:43:41+5:302026-02-14T16:44:55+5:30
जपानच्या राज्यपालांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रस्ताव : २५ वर्षांपूर्वी तालिबान्यांनी नष्ट केली होती मूर्ती

A replica of the Buddha statues of Bamiyan in Afghanistan will be erected in Nagpur.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तालिबानने अफगाणिस्तानील पहाडांमध्ये कोरण्यात आलेल्या ऐतिहासिक बामियान बुद्ध मूर्ती नष्ट केल्या. त्या विध्वंसाला २५ वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथे त्या पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानच्या राज्यपालांना दिला. नागपूर शहर डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून पुनरुज्जीवन घडवून आणलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. या उपक्रमातून जगाला शांततेचा संदेश जाईल आणि भारत-जपान मैत्रीचे प्रतीक निर्माण होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह हॉटेल ताजमहल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी, वाकायामा विधानसभेचे उपाध्यक्ष अकिझुकी फुमिनारी यांच्यासह जपानचे विविध क्षेत्रातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मुंबईस भेट दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ‘अरिगातो गोझायमास’ असे जपानी भाषेत त्यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन वेळा जपान दौऱ्यादरम्यान वाकायामा आणि कोयासन येथे भेट दिली. कोयासन विद्यापीठात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. डिसेंबर २०२३ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. वाकायामा प्रांतीय विधानसभेतील सदस्यांनी भारत-जपान मैत्री वृद्धिंगत करण्यासाठी विशेष गट स्थापन केला आहे.
हे दोन्ही देशांतील मैत्रीचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सध्या जपानचे सुमो पहेलवान पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेत आहेत. या क्रीडा क्षेत्रातील देवाणघेवाणीमुळे दोन्ही देशांना उत्कृष्ट खेळाडू घडविण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
राज्यपाल इजुमी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बामियान बुद्धमूर्ती उभारण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत, या विषयावर पुढील चर्चा करण्याची तयारी दर्शवली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा एकदा जपान भेटीचे निमंत्रण दिले.
महाराष्ट्र-वाकायामा संबंध नव्या उंचीवर नेणार : राज्यपाल मियाझाकी इजुमी
महाराष्ट्र आणि वाकायामा दरम्यान कराराचे २०२८ मध्ये नूतनीकरण करून नवनवीन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा मानस वाकायामाचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी व्यक्त केला. ‘वाकायामा हे जपानमधील महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे’ असे सांगून महाराष्ट्र-वाकायामा मधील संबंध नव्या उंचीवर जातील, असे त्यांनी सांगितले.