Nagpur crime: परिचयातील एका तरुणाने एका विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थिनीने वेळेत मित्राला मोबाइलचे लोकेशन पाठविल्याने ती वाचली. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्वप्निल श्याम लक्षणे (२४) असे आरोपीचे नाव आहे. संबंधित विद्यार्थिनीची स्वप्निलशी एका नातेवाइकाच्या माध्यमातून ओळख झाली होती. काही दिवसांअगोदर स्वप्निलने तिला पार्टी देण्याचा शब्द दिला होता. त्याने तिला फोन केला व पार्टीसाठी बोलविले.
तरुणी चुलत बहिणीसोबत गेली, पण...
संबंधित नातेवाईकदेखील तिथे असेल, असे त्याने सांगितले. विद्यार्थिनी महाविद्यालयात कार्यक्रम असल्याचे सांगून ढाब्यावर पोहोचली. सोबत तिची चुलत बहीणदेखील होती. स्वप्निल त्याच्या दोन मित्रांसह तेथे होता.
नातेवाईक न पोहोचल्याबाबत विद्यार्थिनीने स्वप्निलला विचारणादेखील केली; मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. स्वप्निलने नाश्ता आणि बिअर ऑर्डर केली. बिअर पीत असतानाच विद्यार्थिनीचा नातेवाईक आला व थोड्या वेळाने तो तसेच तिची चुलत बहीण निघून गेले. जेवण झाल्यावर विद्यार्थिनीला दुचाकीवर सोडून देण्याच्या बहाण्याने स्वप्निल तिला हसनबागेतील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला.
शरीर संबंधासाठी दबाव आणू लागला, विद्यार्थिीने...
तो खोलीत विद्यार्थिनीशी अयोग्य वर्तन करू लागला व शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणू लागला. विद्यार्थिनीने त्याला ढकलले आणि बाथरूममध्ये गेली. तिथून तिने एका मित्राला फोन करून आपबीती सांगितली व त्याला लोकेशन पाठविले.
तो मित्र जवळच होता. तो काही वेळातच तेथे पोहोचला. तेथून त्याने तिला बाहेर काढले व तिच्या कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर दोघेही नंदनवन पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी स्वप्निलविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.