आईकडे गेलेल्या व्यक्तीकडे घरफोडी, चोरट्यांकडून दागिन्यांसोबत सिलेंडरदेखील लंपास
By योगेश पांडे | Updated: September 4, 2023 12:24 IST2023-09-04T12:23:56+5:302023-09-04T12:24:31+5:30
अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

आईकडे गेलेल्या व्यक्तीकडे घरफोडी, चोरट्यांकडून दागिन्यांसोबत सिलेंडरदेखील लंपास
नागपूर : आईच्या भेटीसाठी तिच्या घरी गेलेल्या एका व्यक्तीकडे घरफोडी झाली. आश्चर्याची बाब म्हणजे दागिने व रोख रकमेसह चोरटे जाताना सिलेंडरदेखील घेऊन गेले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सुनिल छोटेलाल शाहू (३२, चित्रशाला नगर, वांजरा रोड) हे १ सप्टेंबर रोजी सकाळी घराला कुलूप लावून कुटुंबियांसह कडबी चौक परिसरात राहणाऱ्या आईच्या घरी गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटातील सोनेचांदीचे दागिने व रोख ३५ हजार चोरले. जाताना ते एचपी कंपनीचा गॅस सिलेंडरदेखील घेऊन गेले. चोरट्यांनी जवळपास एक लाखाच्या मुद्देमालावर डल्ला मारला. रविवारी दुपारी घरी परत आल्यावर शाहू यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.