सात वर्षांनी सापडली प्रियकरासोबत गेलेली अल्पवयीन मुलगी; संसार थाटला, मुलही झाले..
By दयानंद पाईकराव | Updated: March 28, 2026 19:57 IST2026-03-28T19:52:31+5:302026-03-28T19:57:19+5:30
Nagpur : प्रियकरासोबत निघून गेलेल्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने तब्बल ७ वर्षांनी शोधून काढत एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

A minor girl who had gone with her boyfriend was found after seven years; The family settled down, and a child was born.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रियकरासोबत निघून गेलेल्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने तब्बल ७ वर्षांनी शोधून काढत एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान घटनेच्या वेळी १७ वर्षांची असलेली ही अल्पवयीन आता २४ वर्षांची झाली असून तिला एक मुलही झाले आहे. मुलगी व तिच्या मुलाला पथकाने एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीची १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी १० जुलै २०१९ रोजी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास घरी कोणाला काही न सांगता निघून गेली होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, परंतु ती कोठेच न आढळल्यामुळे कुटुंबीयांनी एमआयडीसी ठाण्यात पळवून नेणाऱ्या आरोपीविरुद्ध कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाच्या निरीक्षक ललिता तोडासे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास चिंचुलकर, श्याम अंगथुलेवार, ऋषीकेश डुंभरे, पल्लवी वंजारी यांनी तपास केला. पथकाला ही मुलगी ग्वारीघाट, जि. जबलपूर, मध्य प्रदेश येथे असल्याचे समजले. पथकाने तेथे जाऊन २७ मार्च २०२६ रोजी मुलीला ताब्यात घेतले. सध्या तिचे वय २४ वर्ष आहे. घरून निघून गेल्यानंतर आपण सत्यम बोबडे (रा. पुणे) या मुलासोबत लग्न केले असून त्याच्यापासून एक वर्षाचा युवराज नावाचा मुलगा असल्याचे तिने सांगितले. सत्यम हा हैदराबादला कामासाठी गेल्याची माहिती तिने दिली. मुलीचे समुपदेशन केल्यानंतर तिला व तिच्या मुलाला पथकाने ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.
घराशेजारी काम करताना झाली ओळख
अल्पवयीन मुलीच्या घराशेजारी सत्यम काम करीत होता. तेथे अल्पवयीन मुलीची त्याच्यासोबत ओळख झाली. त्यांच्या भेटीगाठी वाढून मोबाइलवर बोलणे सुरू झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीला मिरगीचा आजार असल्यामुळे तिला कुटुंबीयांकडून चांगली वागणूक मिळत नव्हती, त्यामुळे अल्पवयीन मुलीने सत्यमसोबत पळून जाण्याचा निर्णय घेऊन पलायन केले होते.