- योगेश पांडे नागपूर - चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येताच शहराच्या राजकारणात अचानक अनेकजण सक्रिय झाले. भाजप आणि काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांसोबत इतरांनीदेखील काही काळापासून संघटन बांधणीला सुुरुवात केली होतीच. आता त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा दावा केला असून, निवडणुकीची अधिकृत घोषणा कधी होते, याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मनपात गेल्या ५ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर आज तब्बल ३ वर्षे २ महिन्यांनी पुन्हा निवडणूक होणार असल्याने निष्क्रिय झालेले कार्यकर्ते पुन्हा कामाला लागले आहेत. त्यामुळे शहरातील राजकारण चांगलेच तापणार असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
२०१७ च्या आकडेवाडीनुसार, शहरातील ३८ प्रभागांतून १५१ नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये ३७ प्रभागांमध्ये चार, तर एका प्रभागातील नगरसेवकांची संख्या तीन होती. महाविकास आघाडीच्या शासन काळात तीन सदस्यीय प्रभागपद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार प्रभागाची रचना आणि प्रभागाचे आरक्षण सोडतही पार पडली. दरम्यान, राज्यात सत्तांतरण होऊन महायुतीचे सरकार आले. या सरकारने चारसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली.
नागपूर महानगरपालिकेवर मागील पंधरा वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक १०८ नगरसेवक निवडून आले होते; पण वर्ष २०२२ मध्ये मनपाची मुदत संपून प्रशासकराज आल्यानंतर अनेक समीकरण बदलली आहे. त्यामुळे आता नगरसेवकपदासाठी अनेकांनी कंबर कसली असून, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि अपक्ष लढण्यास इच्छुक असणारे अनेकजण तयारीला लागले आहेत. आता पक्ष माजी नगरसेवकांना तिकीट देते की, नव्या चेहऱ्यांना संधी मिळते, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
भाजप पुन्हा एकदा मोठा विजय मिळेल : बंटी कुकडेसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आमचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी नेहमीच तयार असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. महापालिका निवडणुकीतही पक्षाला मोठा विजय मिळेल. नेत्यापासून ते आमदार, माजी नगरसेवक, बूथ, शहर कार्यकारिणी, सर्वजण एकजुटीने काम करतील. -बंटी कुकडे (भाजप शहराध्यक्ष)काँग्रेसची पूर्ण तयारी - विकास ठाकरेसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे काँग्रेस पक्ष स्वागत करत आहे. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. विविध प्रभागांमध्ये तळागाळात कार्यकर्ते तयार आहेत. २०२२ मध्ये महानगरपालिकेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच सर्व विभागांमध्ये तयारी करण्यात आली होती. सुमारे १५०० उमेदवारांनी अर्जही केले होते. प्रशासक काळात काँग्रेस कार्यकर्ते सक्रिय होते. आजही लोकांच्या समस्यांसाठी काँग्रेस कार्यकर्ते लढा देत आहेत. निवडणुकीच्या कालावधीत सत्तेत असलेल्यांना त्यांच्या कामाचा हिशेब मागितला जाईल.- विकास ठाकरे, आमदार व काँग्रेस शहराध्यक्ष‘एकला चलो रे’ की, युती-आघाडीचे गणित?शहरात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्येच होईल अशी चिन्हे आहेत. मात्र, निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीतील घटक पक्ष एकत्रित निवडणूक लढतील की, स्वबळावर मैदानात उतरतील यावर बरीच समीकरणे अवलंबून राहतील. भाजपची सर्व जागांवर निवडणूक लढण्याची तयारी आहे. मात्र, पक्षनेत्यांच्या भूमिकेवर सर्व काही अवलंबून असेल.काय म्हणतात इतर पक्ष पदाधिकारी? महाविकास आघाडीअंतर्गत आम्ही ४० जागांची मागणी करू. पक्षाची स्वत:ची ताकद आहे व त्याचा सन्मान राखला पाहिजे. - प्रशांत पवार शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)* शहरातील काही भागात शिंदेसेनेचे कार्यकर्ते तळागाळातील लोकांशी जुळलेले आहेत. आम्हाला २५ जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे : सूरज गोजे, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदेगट)* सत्ताधाऱ्यांविरोधात आमचा सामना असून जनतेला न्याय मिळवून द्यायचा आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्रित लढतील, अशी आशा आहे : नितीन तिवारी, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धवसेना)
२०१७ निवडणुकीनंतर वर्ष २०२२ मध्ये मनपाची स्थितीभाजप- १०८काँग्रेस-२९बहुजन समाज पक्ष-१०शिवसेना-२राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- १अपक्ष- १