पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 06:51 IST2025-12-20T06:50:24+5:302025-12-20T06:51:19+5:30
बुटीबोरी एमआयडीसीतील घटना

पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
बुटीबोरी (नागपूर) : १५ लाख लिटर पाणी साठवणूक असलेल्या टाकीतील पाण्याचे टेस्टिंग सुरू असताना टाकी फुटली. त्यामुळे ७ कामगारांचा मृत्यू झाला. पाण्याचा दाब आणि टाकीच्या लोखंडी पत्र्यांमुळे जवळच काम करीत असलेल्या तीन कामगारांचा घटनास्थळी, तर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १० कामगार गंभीर जखमी झाले. यातील तिघे अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर नागपुरातील एम्स आणि मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना बुटीबोरी एमआयडीसी परिसरात असलेल्या 'अवाडा' कंपनीच्या आवारात शुक्रवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली.
मृतांची नावे: सुधांशू नागेश्वर साहनी (३०, रा. मुजफ्फरपूर, बिहार), बुलेटकुमार इंद्रजीत सहा (३०, रा. मिश्रोली, सुहानी, प. चंपारण, बिहार), शमीम हसमत अन्सारी (२८, रा. भागवत पारसा, गोपालगंज, बिहार), अरविंदकुमार ठाकूर (२८, रा. चंपारण, बिहार), अशोक कंचन पटेल (४२, रा. पहाडपूर, बिहार) व अजय राजेश्वर पासवान (२६, रा. मुजफ्फरपूर, बिहार), अशी मृतांची नावे आहेत. तर एकाचे नाव कळू शकलेले नाही.
पाण्याचे टेस्टिंग सुरू असतानाच फुटली टाकी
'अवाडा' कंपनीत 'सोलार सेल' तयार केले जातात. त्यासाठी शुद्ध पाणी वापरले जाते. त्यासाठी पाण्याच्च्या तीन वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात. यापैकी कुठली तरी टेस्ट करताना टाकी फुटली आणि कामगारांचा जीव गेला.