दहावीत ८० टक्के गुण मिळविणाऱ्या मुलीने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2022 22:34 IST2022-07-26T22:34:23+5:302022-07-26T22:34:52+5:30
Nagpur News दहावीत ८० टक्के गुण घेत उत्तीर्ण झालेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाझरीतील जयनगरमध्ये घडली.

दहावीत ८० टक्के गुण मिळविणाऱ्या मुलीने घेतला गळफास
नागपूर : दहावीत ८० टक्के गुण घेत उत्तीर्ण झालेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाझरीतील जयनगरमध्ये घडली. संबंधित विद्यार्थिनी अकरावीला प्रवेश घेण्याची तयारी करत होती. सोमवारी ती वडिलांसोबत धरमपेठ येथील ई-सेवा केंद्रात उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गेली होती.
तेथून परतल्यानंतर रामनगर चौकात आल्यानंतर महिमाने वडिलांना ती मैत्रिणीच्या घरी जात असल्याचे सांगितले. वडील बाहेर गेल्यानंतर काही वेळाने महिमा घरी परतली. त्यावेळी घरात कोणीच नव्हते. तिने साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. दुपारी १.४५ वाजता नातेवाईक परतले असता हा प्रकार उघडकीस आला. यानंतर अंबाझरी पोलिसांना माहिती देण्यात आली. तिच्या आत्महत्येने कुटुंबीय हादरले आहेत. सुसाइड नोट नसल्याने आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तिचे वडील चित्रकार आहेत तर आई घरकाम करते. दोन लहान भाऊ शालेय विद्यार्थी आहेत. अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.