सायकलरिक्षा ओढणाऱ्या १२ वर्षीय मुलाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2022 16:43 IST2022-11-29T16:41:41+5:302022-11-29T16:43:20+5:30
यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतली घटना

सायकलरिक्षा ओढणाऱ्या १२ वर्षीय मुलाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू
नागपूर : ज्या वयात अभ्यासाचे धडे गिरवायचे आहे, त्या वयात हाती कामाचे ओझे आलेल्या १२ वर्षीय मुलाचा मोटारसायकलच्या धडकेत मृत्यू झाला. अब्दुल रिझवी शेख (१२, कुंदनलाल गुप्तानगर) असे मृतकाचे नाव असून तो तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सकाळी साडेदहाच्या सुमारास तो कळमना मार्केटमध्ये मालवाहतूक सायकलरिक्षा घेऊन गेला होता. तेथून त्याने कांद्याचे दोन पोते घेतले व ते घेऊन तो राजीव गांधीनगर उड्डाणपुलावरून घरी जात होता. मागून येणाऱ्या भरधाव मोटारसायकलने त्याला धडक दिली. त्यात अब्दुल गंभीर जखमी झाला. मोटारसायकलस्वार अब्दुलला मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला.
अब्दुलच्या डोक्याला मार लागला होता. नागरिकांनी त्याला उपचारासाठी मेडिकल इस्पितळात नेले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा काका अब्दुल कय्युम ऊर्फ अब्दुल सलाम याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मोटारसायकल चालकाविरोधात गुन्हा नोंदविला आहे. अब्दुलला तीन बहिणी आहेत. त्याच्या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.