देशात ९ लाख रुग्णांना आहे पार्किन्सन आजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 11:16 IST2025-04-11T11:15:19+5:302025-04-11T11:16:34+5:30
जागतिक पार्किन्सन दिन : रोगनिदानाकरिता लक्षणे महत्त्वाची

9 lakh patients in the country have Parkinson's disease
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : 'पार्किन्सन डिसीज' हा एक मेंदूचा आजार आहे. जो मन, शरीराच्या हालचाली आणि मेंदूच्या कार्याच्या जवळजवळ सर्व बाबींवर परिणाम करतो. पार्किन्सनच्या आजाराचा परिणाम सर्व वयोगटातील लोकांना होतो, ज्यामध्ये ६५ वर्षावरील १०० लोकांपैकी एकाचा समावेश आहे. जगात सुमारे ९० लाख रुग्णांना या रोगाने ग्रासले आहे. भारतात या रोगाचे जवळपास ९ लाख रुग्ण आहेत आणि दहा वर्षांनंतर हे प्रमाण दुप्पट होईल अशी माहिती, वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.
जागतिक पार्किन्सन दिनाच्या पूर्वसंध्येला मेंदूविकारतज्ज्ञ पत्रकारांशी बोलत होते. डॉ. मेश्राम म्हणाले, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये पार्किन्सनचे प्रमाण दीडपटीने जास्त आहे. ४० वयोगटाखालील तरुणांमध्येसुद्धा हा रोग दिसून येतो. या आजाराचे विशिष्ट लक्षण म्हणजे, कंपन आणि शरीराच्या हालचालीतील संथपणा. हा रोग शरीराच्या एका बाजूला सुरू होतो आणि नंतर हळूहळू पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो. हाथ, पाय कडक होतात. पाठीचा कणा वाकतो. चालण्यात अडचण येते. अचानक खाली पाडण्याचे प्रकार दिसून येतात. लिहिताना अक्षरांचा आकार लहान होतो आणि अक्षर वेडेवाकडे होतात. सहीमध्ये बदल होतो. तोंडातून लाळ सांडत असते. झोपेमध्ये व्यत्यय येतो. लवकर निदान आणि प्रभावी उपचारांमुळे रुग्णांना आराम मिळण्यात आणि त्यांचे जीवनमान चांगले करण्यासाठी आवश्यक ठरतात.
२५ टक्के रुग्णांचे निदान चुकीचे
डॉ. मेश्राम म्हणाले, पार्किन्सन आजाराची सुरुवातीला लक्षणे ओळखली जात नसल्याने सुमारे २५ टक्के रुग्णाचे निदान चुकीचे होते. रोगनिदान हे रुग्णाची तपासणी करून केले जाते. लक्षणे दिसून आल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा आजार का होतो, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ८ ते १० टक्के रुग्णांमध्ये हे अनुवांशिक कारण असते. काही रुग्णांमध्ये पर्यावरणीय घटक, वायू प्रदूषण जबाबदार असू शकतात. पार्किन्सनच्या आजारासारखी लक्षणे विशिष्ट औषधांच्या दुष्परिणामांमुळेदेखील विकसित होतात.
डीप ब्रेन स्टिम्युलेशन' हा शस्त्रक्रियेचा पर्याय -डॉ. जैन
- न्यूरोलॉजिस्ट डॉ. अंकुर जैन यांनी सांगितले, पार्किन्सन हा मेंदूचा एक हळूहळू वाढणारा न्यूरोडिजेनेरेटिव्ह विकार आहे, जो मुख्यत्वे शारीरिक हालचालींवर परिणाम करतो.
- परंतु, पार्किन्सनचे त्वरित निदान आणि योग्य उपचार केल्यास रुग्ण दीर्घकाळ स्वावलंबी राहू शकतो.
- ज्या रुग्णांमध्ये औषधांनी लक्षणांवर नियंत्रण मिळत नाही, किंवा ज्यांना अधिक प्रमाणात ट्रेमर जाणवतात त्यांच्यासाठी 'डीप ब्रेन स्टिम्युलेशन' हा शस्त्रक्रियेचा पर्याय आहे.
स्टेम सेल थेरपीचा वापर करू नये-डॉ. बत्रा
- नागपूर न्यूरो सोसायटीचे सचिव डॉ. धृव बत्रा म्हणाले, पार्किन्सनच्या आजाराबद्दल आणि त्याच्या समाजावर होणाऱ्या परिणामांबद्दल जागरूकता वाढविणे हे आमचे लक्ष्य आहे. हा रोग पूर्ण बरा होण्यासारखा नाही, परंतु योग्य औषधाने रुग्णाची जीवनचर्या सुधारते.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी औषधे घ्यावी व स्वतः औषधोपचार कधीच करू नये. पार्किन्सन आजाराच्या रुग्णांमध्ये स्टेम सेल थेरपीचा वापर करू नये, कारण ते अद्याप संशोधनात आहे.