लोकमत न्यूज नेटवर्कनरखेड : ७८ वर्षीय प्रियकराने प्रेमात अडसर ठरणाऱ्या ३० वर्षीय प्रेयसीच्या तरुण पतीची दुपट्टयाने गळा आवळून हत्या केली. ही घटना नरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेलोनानजीकच्या गंगालडोह शिवारात घडली असून, मंगळवारी (दि. १३) उघडकीस आली. या प्रकरणात प्रियकर व प्रेयसीला अटक करण्यात आले आहे.
शिवशंकर गणुजी धुर्वे (वय ३४) असे मृताचे नाव असून, आरोपींमध्ये शांताराम पुरणसिंग दिदावत (७८) व त्याची प्रेयसी म्हणजेच शिवशंकरच्या ३० वर्षीय पत्नीचा समावेश आहे. हे तिघेही जण बेलोना (ता. नरखेड) येथील रहिवासी आहेत. शांताराम हा भाजप पदाधिकारी उकेश चव्हाण यांच्याकडे दिवाणजी म्हणून, तर शिवशंकर सालगडी म्हणून काम करायचा. शिवशंकर त्याच्या पत्नीसोबत उकेश चव्हाण यांच्या गंगालडोह शिवारातील शेतात राहायचा.
दोघेही एकाच मालकाकडे कामाला असल्याने त्यांची आपसात ओळख होती. त्यातच शांताराम व शिवशंकरच्या पत्नीचे आपसात सूत जुळले. दोघेही शरीरसंबंध करीत असताना शिवशंकरने चारदा प्रत्यक्ष बघितले होते. तो आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्याचे शांतारामला वाटत असल्याने त्याने शिवशंकरला संपविण्याची योजना आखली आणि रविवारी (दि. ११) योजना अंमलात आणली. याप्रकरणी नरखेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ (१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
प्रेमकथेमुळे अडकले पोलिसांच्या जाळ्यात
- पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नरखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणला.
- त्याचा मृत्यू गुदमरून झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होताच पोलिसांनी गावात चौकशी सुरू केली.
- त्यांना या दोघांची प्रेमकथा कळताच त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. दोघांनीही हत्या केल्याची कबुली देताच त्यांना अटक केली.
दारू पिऊन पडला असल्याचा बनावउकेश चव्हाण यांची गायमुख (ता. नरखेड) शिवारात शेती आहे. शांतारामने रविवारी शिवशंकरला गायमुख शिवारातील शेतात नांगरणी करण्यासाठी पाठविले. दुपारी शिवशंकरची पत्नी त्याच्या जेवणाचा टिफीन घेऊन शेतात गेली. तिच्या मागे शांताराम शेतात पोहोचला. त्याने शिवशंकरचा दुपट्ट्याने गळा आवळून खून केला व घरी परत आला. त्यानंतर त्याने मयूर बावणे यास शिवशंकर शेतात दारू पिऊन पडून असेल. त्याला बैलगाडीत टाकून घेऊन ये, अशी सूचना केली. तो मयूरला मृतावस्थेत पडून असल्याचे दिसल्याने हत्येचे बिंग फुटले.