मंजूर जागा ७५ पण प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे भरणार केवळ ३६; आयुर्वेद पीजी विद्यार्थ्यांसमोर संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 18:55 IST2025-06-28T18:54:53+5:302025-06-28T18:55:25+5:30

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय : रिक्त पदे, कंत्राटी शिक्षक, निवृत्तीचा फटका

75 seats approved but only 36 will be filled due to shortage of professors; Ayurveda PG students face crisis | मंजूर जागा ७५ पण प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे भरणार केवळ ३६; आयुर्वेद पीजी विद्यार्थ्यांसमोर संकट

75 seats approved but only 36 will be filled due to shortage of professors; Ayurveda PG students face crisis

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांसाठी मंजूर असलेल्या ७५ जागांपैकी या वर्षी केवळ ३६ जागांवरच प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. महाविद्यालयात प्राध्यापकांची मोठी कमतरता, कंत्राटी पद्धतीवरील शिक्षकांचे अस्थैर्य आणि आगामी सेवानिवृत्तीमुळे पीजी अभ्यासक्रमाच्या जागांवर विपरीत परिणाम होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याबरोबरच आयुर्वेद शिक्षणाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात १० विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांना मंजुरी प्राप्त आहे. या विषयांसाठी एकूण ७५ पीजी जागा मंजूर आहेत. मात्र, सध्याच्या स्थितीत उपलब्ध असलेले प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या संख्येमुळे मागील वर्षी ४० पीजी जागा भरण्यात आल्या होत्या. तर या वर्षी शिक्षकांची रिक्त पदे, कंत्राटी शिक्षक आणि पुढील दोन वर्षात निवृत्त होणारे शिक्षक यामुळे ही संख्या आणखी ४ ने कमी होऊन ३६ पर्यंत येण्याची शक्यता आहे. मंजूर पदांपैकी निम्म्या पीजी जागांवरच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याने आयुर्वेदिक शिक्षणाचे भवितव्य धोक्यात आले आहे. 


पदभरती आणि नवीन प्रस्ताव
सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदभरती आणि बढतीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच १४ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पीजी जागांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावांना लवकर मंजुरी मिळाल्यास पीजीच्या जागा वाढण्याची शक्यता महाविद्यालय प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.


अॅडिशनल पद नसल्याने चार विषयांत पीजींना फटका
द्रव्यगुण, स्त्रीरोग, बालरोग आणि पंचकर्म या चार विषयांमध्ये कायमस्वरूपी शिक्षकांच्या जागा भरलेल्या आहेत. मात्र, अॅडिशनल सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदांना शासनाची मंजुरी प्राप्त नाही. त्यामुळे या चारही विषयांत पीजी जागांना फटका बसला आहे.


शिक्षकांची कमतरता आणि कंत्राटी पद्धतीचा फटका
महाविद्यालयात एकूण ६६ पदे मंजूर आहेत. यांपैकी फक्त ३२ पदे कायमस्वरूपी भरलेली आहेत, तर २५ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. ९ पदे अजूनही रिक्त आहेत. कंत्राटी पदे ही ११ महिन्यांसाठी असतात. विद्यापीठाच्या निकषानुसार, पीजी गाइडसाठी शिक्षकांची पदे कायमस्वरूपी असणे आवश्यक असते.


निवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा पीजीला फटका

  • विद्यापीठाच्या निकषानुसार प्राध्यापकाला ३ तर सहयोगी प्राध्यापकाला २ पीजी विद्यार्थी मिळतात. परंतु, ज्यांची निवृत्ती २४ महिन्यांच्या आत असेल, त्यांना पीजी विद्यार्थी मिळत नाही.
  • प्राप्त माहितीनुसार, रोगनिदान या 3 विषयातील एक प्राध्यापक याच वर्षात सेवानिवृत्त होत आहेत. तर याच विषयातील एक सहयोगी प्राध्यापक पुढील वर्षी निवृत्त होतील.
  • यामुळे एकूण ५ पीजी जागांचे 3 नुकसान होणार आहे. शालाक्य तंत्र या विषयात एकच कायमस्वरूपी शिक्षक आहेत आणि तेही या वर्षी सेवानिवृत्त होत आहेत.
  • त्यामुळे या विषयात एकही पीजी जागा भरली न जाण्याची शक्यता आहे. कायाचिकित्सा या विषयामध्ये एक सहयोगी प्राध्यापक पुढील वर्षी निवृत्त होत आहेत, ज्यामुळे या विषयात २ जागांचे नुकसान होणार आहे.

Web Title: 75 seats approved but only 36 will be filled due to shortage of professors; Ayurveda PG students face crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.