७ बुडित गावांची बत्ती गुल ! उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:21 IST2018-09-04T23:12:31+5:302018-09-04T23:21:08+5:30
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात पाणी साठविण्याची मोहीम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाचा जलस्तर दिवसागणिक वाढत आहे. प्रकल्पातील ‘बँक वॉटर’ ने बुडित गावांना वेढा घातल्यामुळे येथील घरे सुध्दा पाण्याच्या तावडीत सापडली आहे. अशात दुर्घटनेची शक्यता वर्तवित उपजिल्हाधिकाऱ्यांनी या बुडित गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले. आदेश धडकताच महावितरणच्या पथकानी तालुक्यातील तब्बल सात बुडित गावांचा विद्यूत पुरवठा मंगळवारी सायंकाळच्या सुमारास खंडित केला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना जलयातनांसह आता अंधारयातना भोगाव्या लागत आहे.

७ बुडित गावांची बत्ती गुल ! उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात पाणी साठविण्याची मोहीम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाचा जलस्तर दिवसागणिक वाढत आहे. प्रकल्पातील ‘बँक वॉटर’ ने बुडित गावांना वेढा घातल्यामुळे येथील घरे सुध्दा पाण्याच्या तावडीत सापडली आहे. अशात दुर्घटनेची शक्यता वर्तवित उपजिल्हाधिकाऱ्यांनी या बुडित गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले. आदेश धडकताच महावितरणच्या पथकानी तालुक्यातील तब्बल सात बुडित गावांचा विद्यूत पुरवठा मंगळवारी सायंकाळच्या सुमारास खंडित केला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना जलयातनांसह आता अंधारयातना भोगाव्या लागत आहे.
गोसेखुर्द प्रकल्पात तालुक्यातील १८ गावे बुडित क्षेत्रात आली असून त्यांचे पुनर्वसन तालुकास्थळापासून काही अंतरावर करण्यात आले. यातील काही गावांना स्थलांतरित करण्यात शासनाला यश आले असले तरी काही प्रकल्पग्रस्तांनी मूळ गाव सोडण्यास माञ नकार दिला. गत दोन वर्षापूर्वीसुध्दा प्रकल्पाचा जलस्तर वाढल्यामुळे दुर्घटनेची शक्यता वर्तवत प्रशासनाने बुडित १८ गावांपैकी मरूनदीच्या पलीकडची १० गावे तर अलीकडचे एक गाव अशा ११ बुडित गावांचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे प्रकल्पग्रस्त विरुध्द प्रशासन असे शीतयुध्द पेटले होते. मात्र विद्युत पुरवठा सुरू करण्याबाबत शासन निर्णय घेत नसल्यामुळे अखेरीस या ११ बुडित गावांतील अनेक प्रकल्पग्रस्तांनी गाव सोडत पुनर्वसनस्थळावर संसार उभा करण्यावर भर दिला.
पाणी साठविण्याच्या मोहामुळे प्रकल्पाचा जलस्तर वाढून तालुक्यातील चार बुडित गावांना गत चार दिवसांपूर्वी बँक वॉटरच्या पाण्याने वेढा घातला होता. प्रशासनाने या प्रकल्पग्रस्तांना गाव खाली करून पुनर्वसनस्थळावर जाण्याची विनंती केली. मात्र प्रकल्पग्रस्त आपल्या भूमिकेवर अद्यापही ठाम आहे. अखेरीस वाढलेल्या जलस्तरामुळे धोका उद्भवण्याचे कारण पुढे करीत उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे (गोसेखुर्द) यांनी बुडित सातही गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले.
या गावांचा पुरवठा खंडित
११ बुडित गावांपैकी ७ गावांचा विद्युत पुरवठा प्रशासनाने गत दोन वर्षापूर्वी खंडित केला होता. आता शिल्लक असलेल्या मोखेबर्डी, किन्ही (कला), किन्ही (खुर्द), किटाळी, सावरगाव, नेरी, नागतरोली या सात गावांचा विद्युत पुरवठा महावितरणने खंडित केला
असा आहे आदेश
उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे (गोसेखुर्द) यांनी १ सप्टेंबर रोजी कार्यकारी अभियंता विद्युत महावितरण यांना पत्र दिले असून यात गोसेखुर्द प्रकल्पाच्या जलस्तरात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे बुडित गावांत पाणी यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या गावातील विद्युत पुरवठा बाधित होत आहे. दरम्यान विद्युत पुरवठ्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून बाधित गावातील विद्युत पुरवठा बंद करण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी आदेश दिले आहे. या निर्देशानुसार बुडित गावातील विद्यूत पुरवठा डी.पी.सह तात्काळ बंद करून वायर गुंडाळून ठेवावे. कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करावा, असे नमूद केले आहे.
प्रशासनाचे कटकारस्थान?
किन्ही (कला) येथील प्रकल्पग्रस्त रोशन गायधने यांनी लोकमतशी बोलताना प्रशासनाच्या या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला. शिवाय प्रकल्पग्रस्तांनी गाव खाली करण्यासाठी प्रशासनाने रचलेले हे कारस्थान असल्याचाही आरोप त्यांनी केला. या विरोधात असंख्य प्रकल्पग्रस्तांना घेऊन आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला .