६३वा धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीवर धम्मदीक्षेचा मंगळवारी मुख्य सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 19:52 IST2019-10-07T19:46:41+5:302019-10-07T19:52:11+5:30
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने पवित्र दीक्षाभूमीवर ‘६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिना’चा मुख्य सोहळा मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

६३वा धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीवर धम्मदीक्षेचा मंगळवारी मुख्य सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने पवित्र दीक्षाभूमीवर ‘६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिना’चा मुख्य सोहळा मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून थायलंड येथील भदन्त डॉ. परमहा अनेक व म्यानमार येथील महाउपासक टेंग ग्यार तर अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई उपस्थित राहतील.
दीनदलितांच्या उद्धाराचा मार्ग खुला करून त्यांना उज्ज्वल भवितव्याची दिशा दाखवणारे युगनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनिष्ट रूढी व परंपरेत अडकलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नागपूर येथे धम्मदीक्षा घेतली. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दर अशोक विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन केले जाते. शनिवारपासून सुरू झालेल्या या सोहळयाचा तिसऱ्या दिवशी रविवार ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता पवित्र दीक्षाभूमीवर पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, भन्ते नागदीपांकर, समता सैनिक दलाचे प्रदीप डोंगरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रमोद गेडाम, मधुकर मेश्राम, देवकुमार रंगारी, कैलाश वारके, शरद मेश्राम आदी उपस्थित होते.