खेळायला गेलेल्या ६ वर्षीय चिमुकल्याचा सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू; नागपूरची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 09:09 IST2026-03-18T09:07:29+5:302026-03-18T09:09:03+5:30
उपराजधानीत नागरी सुविधांच्या दुरवस्थेने पुन्हा एकदा एका निष्पाप बालकाचा बळी घेतला आहे.

खेळायला गेलेल्या ६ वर्षीय चिमुकल्याचा सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू; नागपूरची घटना
उपराजधानीत नागरी सुविधांच्या दुरवस्थेने पुन्हा एकदा एका निष्पाप बालकाचा बळी घेतला आहे. वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सांडपाण्याच्या उघड्या खड्ड्यात पडून ६ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून, स्थानिक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दानिश अयाज अन्सारी (वय ६ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. दानिश हा वाठोडा परिसरातील शारदा नगर येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. काल संध्याकाळी तो घराशेजारील मोकळ्या मैदानात खेळण्यासाठी गेला होता. खेळता खेळता अचानक त्याचा तोल गेला आणि तो तिथेच असलेल्या एका खोल सांडपाण्याच्या खड्ड्यात पडला.
दोन तासांच्या शोध मोहिमेनंतर समोर आले थरारक वास्तव
दानिश बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. परिसरात सर्वत्र शोध घेऊनही तो सापडत नसल्याने चिंतेचे वातावरण पसरले होते. अखेर सुमारे दोन तासांनंतर मैदानातील सांडपाण्याच्या खड्ड्यात दानिशचा मृतदेह तरंगताना आढळला.घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दानिशच्या मृत्यूमुळे अन्सारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
खड्ड्यातील घाणेरडे पाणी नाक आणि तोंडात गेल्यामुळे गुदमरून त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अजून किती बळी घेणार? असा सवाल उपस्थित करत दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आणि शहरातील सर्व उघडे खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी रहिवासी करत आहेत.