दोन वर्षांत रेल्वेत तयार होणार ५३०० जनरल कोच
By नरेश डोंगरे | Updated: July 4, 2024 19:01 IST2024-07-04T18:59:47+5:302024-07-04T19:01:13+5:30
सामान्य वर्गातील प्रवाशांवर रेल्वेचा फोकस : १० हजार नॉन एसी कोचच्या निर्मितीचे लक्ष्य

5300 general coaches will be ready in two years
नरेश डोंगरे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :रेल्वे गाड्यांमधील वाढलेली प्रचंड गर्दी आणि जनरल कोचची कमी असलेली संख्या यामुळे सामान्य वर्गातील प्रवाशांची प्रचंड कुचंबना होत आहे. त्या संबंधाने मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. त्या लक्षात घेता रेल्वे बोर्डाने पुढच्या दोन वर्षांत १० हजार नॉन एसी कोच निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. यातील ५३०० कोच जनरल राहणार आहेत, हे विशेष !
गेल्या वर्षभरात सर्वच मार्गावर रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात रेल्वेकडून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी गाड्यांमधील जनरल कोचची संख्या कमी केल्याने गरिब वर्गाच्या रेल्वे प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे. एसीचे तिकिट काढून प्रवास करणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे ते जनरलच्या तिकिटा घेऊन गाडीत चढतात. जागा मिळेल तेथे बसून, उभे राहून प्रवास करतात. त्यामुळे अन्य प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे रेल्वे गाड्यात वाद होतात. त्याच्या तक्रारीही होतात अन् अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगा केला जातो. हा सर्व प्रकार प्रवाशांसाठीच नव्हे तर रेल्वे अधिकाऱ्यांसाठीही मनस्तापाचा विषय ठरला आहे. तो लक्षात घेता रेल्वे बोर्डाने पुढच्या दोन वर्षांत १० हजार नवीन कोच निर्माण करण्याची योजना तयार केली आहे. त्यात ५३०० कोच जनरलचे राहणार आहेत.
असा आहे कोच निर्मितीचा आराखडा
२०२४ -२५ मध्ये अमृत भारत जनरल कोच सह एकूण २६०५ कोच, १४७० स्लीपर आणि नॉन एसी कोच, ३२३ एसएलआर कोच, ३२ पार्सल व्हॅन आणि ५५ पॅन्ट्री कार तयार करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे २०२५-२६ मध्ये अमृत भारत जनरल कोचसह २७१० कोचची निर्मिती केली जाणार असून, १९१० नॉन एसी स्लीपर, ५१४ एसएलआर कोच, उच्च क्षमतेच्या २०० पार्सल व्हॅन आणि ११० पॅन्ट्री कार निर्माण करण्याची योजना रेल्वेने बनविली आहे.