नागनदी विकासात ४० अडथळे

By Admin | Updated: July 20, 2014 01:24 IST2014-07-20T01:24:03+5:302014-07-20T01:24:03+5:30

नागनदीचे सौंदर्यीकरण आणि विकासाच्या दरम्यान माहितीशी निगडित ४० अडथळे आहेत. ही माहिती महापालिका उपलब्ध करून देण्यात यशस्वी झाल्यास नागनदीचा कायापालट होऊ शकणार आहे.

40 obstacles in the development of Nagalandi | नागनदी विकासात ४० अडथळे

नागनदी विकासात ४० अडथळे

रुडकीच्या तज्ज्ञांकडून पाहणी : महापालिका १५ दिवसात देणार अहवाल
नागपूर : नागनदीचे सौंदर्यीकरण आणि विकासाच्या दरम्यान माहितीशी निगडित ४० अडथळे आहेत. ही माहिती महापालिका उपलब्ध करून देण्यात यशस्वी झाल्यास नागनदीचा कायापालट होऊ शकणार आहे. आयआयटी रुडकीच्या तज्ज्ञांनी अरुण कुमार, व्ही. के. गुप्ता यांच्या नेतृत्वात शनिवारी नागनदीची पाहणी करून माहिती जाणून घेतली. यात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर १५ दिवसात उत्तरे देण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे.
आयआयटी रुडकीच्या तज्ज्ञांनी सकाळी ९ ते दुपारी १२ दरम्यान नागनदीची सद्यस्थिती, सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट, शुद्ध होणाऱ्या पाण्याबाबत माहिती जाणून घेतली. यानंतर विविध विभागांपासून त्यांचे मत जाणून घेतले. अंबाझरी, व्हीएनआयटी, संगम चाळ, अशोक चौक, नंदनवन जवळच्या भागाचा त्यांनी दौरा केला. अरुण कुमार यांनी ४० प्रकारच्या अडचणी नागनदीच्या संदर्भात असल्याचे सांगितले. दौऱ्यात महापालिकेचे अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे, पेंच प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शाम चव्हाण, मो. इजराईल उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार रुडकीचे तज्ज्ञ दौऱ्यानंतर अहवाल तयार करून तो केंद्र शासनाकडे सोपविणार आहेत. केंद्राच्या पाच मंत्रालयांच्या एका समितीकडे हा अहवाल देण्यात येईल.
अहवालात नमूद त्रुटी आणि मागितलेल्या माहितीच्या आधारे नवा विस्तृत अहवाल तयार करून महापालिकेला सोपविण्यात येईल. त्यानंतर प्रकल्पाला पर्यावरण आणि वनविभागाच्या परवानगीनंतर अंतिम मंजुरी मिळेल. तज्ज्ञांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी महापौर अनिल सोले यांनी महापालिकेशी संबंधित विभागाचे अधिकारी, नागनदी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट (पीएमसी) मुंबईला १५ दिवसांचा कालावधी दिला आहे.
१५ दिवसात माहिती मिळाल्यास केंद्राच्या वेगवेगळ्या विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचा शुभारंभ २ ते ३ महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत ११७ कोटी रुपये खर्चून नागनदी पुनर्जीवित करण्याची योजना आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 40 obstacles in the development of Nagalandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.