नागपुरात लोहमार्ग पोलिसांनी व्यापाऱ्याचे ४० लाख लुटले : दोघांना केले निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:00 IST2019-10-19T23:59:35+5:302019-10-20T00:00:57+5:30
लोहमार्ग पोलिसांनी मुंबईतील एका व्यापाऱ्याचे ४० लाख रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसात खळबळ उडाली आहे.

नागपुरात लोहमार्ग पोलिसांनी व्यापाऱ्याचे ४० लाख लुटले : दोघांना केले निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोहमार्ग पोलिसांनी मुंबईतील एका व्यापाऱ्याचे ४० लाख रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसात खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहमार्ग पोलिसातील संजय सुखदेवे, दर्शन झाडे हे दोन शिपाई यात सहभागी आहेत. मुंबईचा एक व्यापारी नेहमीच लाखो रुपये घेऊन दुसऱ्या राज्यात जातो. व्यापाऱ्याचा नोकर नागपुरातील पोलिसांचा मित्र आहे. त्याने याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. दोघांनीही योजना आखून मुंबईला गेले. व्यापारी पैसे घेऊन निघताच त्याला रस्त्यात थांबवून जवळील ४० लाखासंदर्भात विचारणा केली. ही रक्कम हवालाची असून आम्हाला जप्त करायची असल्याचे सांगितले. व्यापाऱ्याने हे प्रकरण निपटविण्यासाठी त्यांना एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. परंतु पोलिसांनी पैसे न घेता व्यापाऱ्याला आपल्या वाहनात बसविले. रस्त्यात वाहन थांबवून व्यापाऱ्याला खाली उतरविले आणि पैसे घेऊन निघाले. पोलिसांनी कारवाई न करता पैसे घेऊन गेल्यामुळे व्यापाऱ्याने जवळच्या गुन्हे शाखेत धाव घेतली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागपूर गाठले. याप्रकरणी दोन्ही पोलीस शिपायांना लोहमार्ग पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी निलंबित केल्याची माहिती आहे.