शिक्षक झाले पुन्हा विद्यार्थी! राज्यातील ४ लाख ७९ हजार उमेदवार देणार टीईटीची परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 07:32 IST2025-10-27T07:32:16+5:302025-10-27T07:32:25+5:30
TAIT परीक्षा या दोन परीक्षा आता शिक्षकांच्या भविष्याची दिशा आणि गती ठरवणाऱ्या ठरणार आहेत.

शिक्षक झाले पुन्हा विद्यार्थी! राज्यातील ४ लाख ७९ हजार उमेदवार देणार टीईटीची परीक्षा
बालाजी देवर्जनकर
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्र एका निर्णायक परीक्षेसाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. २३ नोव्हेंबरला होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि त्यानंतर ८ फेब्रुवारीला होणारी TAIT परीक्षा या दोन परीक्षा आता शिक्षकांच्या भविष्याची दिशा आणि गती ठरवणाऱ्या ठरणार आहेत. राज्यातील तब्बल ४ लाख ७९ हजार उमेदवार यावर्षी टीईटी परीक्षेला बसणार असून, यातील जवळपास अर्धे उमेदवार कार्यरत शिक्षक आहेत.
शिक्षकांचा ‘अभ्यासमहोत्सव’ ऑनलाइन क्लासरूममध्ये व्यस्त
पूर्वी वर्गात विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आता स्वतः ‘ऑनलाइन क्लासेस’मध्ये विद्यार्थी म्हणून बसले आहेत. राज्यातील विविध ई-लर्निंग प्लॅटफॉर्म्स, कोचिंग इन्स्टिट्यूट्स, यूट्यूब चॅनल्स आणि मॅरेथॉन सेशन्स यामधून सध्या शिक्षकांचा ‘अभ्यासमहोत्सव’ सुरू आहे.
सुटीच्या दिवशी चालणाऱ्या ‘मॅरेथॉन टेस्ट सिरीज’, टॉपिकवाइज प्रॅक्टिस पेपर्स आणि फुल-लेंथ मॉक टेस्ट्स यांनी वातावरणात अक्षरशः परीक्षापूर्व तापमान वाढले आहे. टीईटीनंतर ८ फेब्रुवारीला होणारी TAIT परीक्षा म्हणजे शिक्षकांच्या व्यावसायिक कारकिर्दीतील निर्णायक टप्पा आहे. याच निकालावर शिक्षक भरतीचे भवितव्य ठरणार आहे.
अशी असेेल दोन स्तरांवरील ‘टीईटी’
पेपर १ : इयत्ता १ली ते ५वीसाठी
पेपर २ : इयत्ता ६वी ते ८वीसाठी
काळ बदलला, अभ्यासपद्धती बदलल्या; पण शिकण्याची तहान अजून तशीच आहे. आज आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसारखेच नोट्स बनवतो, प्रॅक्टिस टेस्ट देतो आणि शंका विचारतो. कारण काळाच्या गरजेनुसार स्वतःला सिद्ध करणे हीच खरी शिक्षकीवृत्ती आहे- एक शिक्षक, टीईटी उमेदवार