आयआयएम नागपूरच्या ‘ब्लेंडेड एम. बी. ए.’ साठी जगभरातून आले ३७३ अर्ज, ८३ उमेदवारांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 21:09 IST2025-11-22T21:08:43+5:302025-11-22T21:09:09+5:30
‘ब्लेंडेड एमबीएच्या’ या पहिल्याच तुकडीसाठी केवळ भारतातूनच नव्हे तर इतर अनेक देशांमधून तब्बल ३७३ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी ८३ विद्यार्थ्यांची निवड केली गेली आहे.

आयआयएम नागपूरच्या ‘ब्लेंडेड एम. बी. ए.’ साठी जगभरातून आले ३७३ अर्ज, ८३ उमेदवारांची निवड
- आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम) नागपूरतर्फे व्यवसाय किंवा नोकरी करीत असलेल्या अनुभवी लोकांसाठी वैशिष्ठ्यपूर्ण अश्या ‘ब्लेंडेड एमबीए’ अभ्यासक्रमाची सुरुवात शनिवारी करण्यात आली. ‘ब्लेंडेड एमबीएच्या’ या पहिल्याच तुकडीसाठी केवळ भारतातूनच नव्हे तर इतर अनेक देशांमधून तब्बल ३७३ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी ८३ विद्यार्थ्यांची निवड केली गेली आहे. यात भारताच्या २० हून अधिक राज्यांतून आलेल्या तसेच परदेशातील काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.
या अभ्यासक्रमाचे औपचारिक उद्घाटन शनिवारी केले गेले. आय. आय. एम. नागपूरचे संचालक प्रा. भिमराया मेत्री यावेळी अध्यक्षस्थानी होते. मुख्य अतिथी म्हणून केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. मुथुकुमार तर विशेष अतिथि म्हणून मॅकॅफी सॉफ्टवेअर प्रा. लि. चे चॅनेल मार्केटिंग (इंडिया अँड मिडल ईस्ट) प्रमुख निलभ नाग उपस्थित होते. आय. आय. एम नागपूर चे प्रा. देबारुण चक्रवर्ती हे या अभ्यासक्रमाचे कार्यक्रम संयोजक आहेत.
या पहिल्या बॅचसाठी परदेशी इच्छुकांसह एकूण ३७३ अर्ज प्राप्त झाले. यापैकी २३२ उमेदवारांची लेखी चाचणी आणि त्यानंतर मुलाखती घेण्यात आल्या. यातून ८३ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या गटामध्ये ६४ पुरुष आणि १९ महिला सहभागी असून पहिल्या तुकडीचे सरासरी वय ३१ वर्षे आणि सरासरी कार्यानुभव ७ वर्षे आहे.
माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, रुग्णालय उपकरणे, शिक्षण आणि प्रशिक्षण, तेल आणि नैसर्गिक वायु, वीज निर्मिती आणि वितरण, कन्सल्टिंग, निर्मिती, विक्री, लॉजिस्टिक्स, डिफेन्स, फार्मा, केमिकल, शेती, अन्न निर्मिती आणि प्रक्रिया, ओ. ई. एम. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांचा समावेश आहे. टाटा, कॉगनिझन्ट हिंदुस्थान पेट्रोलियम, लॉयडस, आणि इतर प्रतिष्ठित संस्थांतील कर्मचारी या अभ्यासक्रमात प्रविष्ट झाले आहेत.