बाल तस्करीच्या संशयावरून बिहारकडे जाणारी २२ मुले ताब्यात; यवतमाळ जिल्ह्यातून पोहचली नागपुरात : रेल्वे स्थानकावर कारवाईमुळे गोंधळ

By नरेश डोंगरे | Updated: January 30, 2026 21:34 IST2026-01-30T21:34:21+5:302026-01-30T21:34:46+5:30

शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर २२ अल्पवयीन मुले उभी होती. त्यांच्यासोबत एक मौलाना आणि दुसरा एक केअर टेकर होता.

22 children heading to Bihar detained on suspicion of child trafficking; Reached Nagpur from Yavatmal district: Confusion due to action at railway station | बाल तस्करीच्या संशयावरून बिहारकडे जाणारी २२ मुले ताब्यात; यवतमाळ जिल्ह्यातून पोहचली नागपुरात : रेल्वे स्थानकावर कारवाईमुळे गोंधळ

बाल तस्करीच्या संशयावरून बिहारकडे जाणारी २२ मुले ताब्यात; यवतमाळ जिल्ह्यातून पोहचली नागपुरात : रेल्वे स्थानकावर कारवाईमुळे गोंधळ

- नरेश डोंगरे 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाल तस्करीच्या संशयावरून यवतमाळ जिल्ह्यातील मदरशातून आलेल्या २२ मुलांना येथील रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे रेल्वे स्थानक परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसभराच्या चाैकशीनंतर या मुलांना चाईल्ड लाईनच्या माध्यमातून बालसुधार गृहात पाठविण्यात आले. चाैकशीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करायची की काय, त्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर २२ अल्पवयीन मुले उभी होती. त्यांच्यासोबत एक मौलाना आणि दुसरा एक केअर टेकर होता. हे सर्व २४ जण अमृत भारत एक्सप्रेसने बिहारच्या पुर्णीया जिल्ह्यात जाणार होती. ट्रेन यायला वेळ असल्याने ते सर्व प्रतीक्षा करत होते. दरम्यान, स्टेशन मास्तरच्या नजरेस ते सर्व पडले. एवढ्या मोठ्या प्रमाणात बालके दिसतात, मात्र त्यांचे पालक दिसत नसल्याने स्टेशन मास्तरने रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिस आणि चाईल्ड लाईनला पाचारण केले. जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्याचेही पथक पोहचले. त्यांनी या मुलांची आणि माैलानाची चाैकशी केली. ही सर्व मुले यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील मदरशामध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती पुढे आली. फेब्रुवारीत रमजान असल्याने त्यांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे ते पुर्णीया (बिहार) जिल्ह्यातील आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले होते, असे माैलानांनी सांगितले. आर्णी येथील मदरशातील कागदपत्रे, तेथील नगरसेवकाचे पत्र सुद्धा माैलानाने दाखविले. त्यानंतर चाईल्ड लाईन आणि रेल्वे पोलिसांनी मुलांच्या पालकांशी संपर्क सुरू केला. सायंकाळपर्यंत मोजक्याच लोकांशी संपर्क झाल्याने या सर्व मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना
पाटणकर चाैकातील शासकीय बालगृहात रवाना करण्यात आले.

मुले अल्पवयीन, कागदपत्रेही अपुरी
मुले अल्पवयीन असल्याने आणि पुरेशी कागदपत्रे नसल्याने त्यांची तस्करी तर केली जात नाही ना, अशी शंका काही अधिकाऱ्यांना होती. त्यामुळे जीआरपीकडे तक्रार देऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काही जणांनी केली होती. मात्र, अनेक मुलांच्या पालकांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी आणि माैलानांनी दिलेली माहिती सारखी असल्याने अन्य पालकांशी संपर्क झाल्यानंतरच कारवाईबाबत निर्णय घेण्याची भूमीका संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली.

माैलानाकडे २२ मुलांसह २४ जणांचे रेल्वेची तिकिटं आढळली. मदरसा तसेच स्थानिक नगरसेवकांचे पत्रही होते. काही मुलांच्या पालकांनी मुले शिक्षणासाठी आर्णी (जि. यवतमाळ) येथील मदरशात पाठविल्याचे सांगितले. प्रकरण संवेदनशिल आहे. अनेक पैलू तपासायचे आहे. चाईल्ड लाईनकडूनही चाैकशी केली जात आहे. त्यानंतरच गुन्हा दाखल करायचा की नाही, त्याचा निर्णय घेतला जाईल.
- गाैरव गावंडे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, रेल्वे पोलिस नागपूर.

Web Title : बाल तस्करी के संदेह में बिहार जा रहे 22 बच्चे नागपुर में हिरासत में

Web Summary : नागपुर रेलवे पुलिस ने बाल तस्करी के संदेह में यवतमाल से बिहार जा रहे 22 बच्चों को हिरासत में लिया। एक मौलाना के साथ, वे अमृत भारत एक्सप्रेस से जा रहे थे। माता-पिता की अनुपस्थिति और अधूरे दस्तावेज़ों के कारण चिंताएँ हुईं, जिससे आगे की जाँच और बाल गृह में रखा गया।

Web Title : 22 Children Detained in Nagpur Suspected of Child Trafficking to Bihar

Web Summary : Nagpur Railway Police detained 22 children from Yavatmal, suspected of trafficking to Bihar. Accompanied by a Maulana, they were en route via Amrut Bharat Express. Concerns arose due to missing parental figures and incomplete documentation, leading to further investigation and placement in a children's home.